तिरोडा,दि.30 : भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्ता स्थापन केली. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. उलट लोकांच्या अपेक्षांचा भंग केला असून महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली आहे. मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. मात्र आपण या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तिरोडा तालुक्यात आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे व माजी आ.दिलीप बन्सोड, पंचम बिसेन, विजय शिवणकर, योगेंद्र भगत, राजलक्ष्मी तुरकर, कैलाश पटले, अर्जुन नागपुरे, घनश्याम मस्करे, कृष्णकुमार जायस्वाल, विमल नागपुरे, तुलीसराम बघेले, रिना रोकडे, निता पटले, रिना बघेले उपस्थित होते.
खासदार पटेल म्हणाले, आई-वडील काबाळ कष्ट करुन मुलांना शिकवून अधिकारी बनविण्याचा प्रयत्न करतात. मात्र देशाचा चौकीदार सुशिक्षित तरुणांना चौकीदार बनण्याचे निमंत्रण देऊन लाखो आई-वडीलांच्या स्वप्न आणि अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम करीत असल्याची टिका केली.
भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता न करता उलट बेरोजगारांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचा सल्ला दिला. तर जीएसटी लागू करुन व्यापार डबघाईस आणला व पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून सर्व सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. त्यामुळे आता मतदारांनाच योग्य काय आहे ते ठरवून आपला लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे. नाना पंचबुध्दे हे माजी राज्यमंत्री राहिले असून यापुढे सुध्दा त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून या क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. त्यामुळे ११ एप्रिलला मतदान करताना खोट्या आश्वासनला बळी पडून मतदान करु नकातर सजगपणे मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment