Saturday, 30 March 2019

ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्‍यता – नाना पटोले

नागपूर,दि.30 : ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून, ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्‍यता कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केली. याची तक्रार मुख्य व राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
ईव्हीएमवर सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोग मात्र ते सुरक्षित असल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे ईव्हीएमची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी आयोगाची आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे लोकसभा निवडणुकीसाठी आलेल्या ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. विधानसभानिहाय स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. यावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे आयोगाचे आदेश आहे. मात्र, मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमसमोरील सीसीटीव्ही बंद असल्याचा दावा पटोले यांनी केला. त्याचा व्हिडिओसुद्धा त्यांनी पत्रकारांना दाखविला. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे, अतुल लोंढे, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.

चौकशी करू : मुद्‌गल

सीसीटीव्ही बंदसंदर्भात कॉंग्रेसची तक्रार मिळाली. सीसीटीव्ही कॅमेरे बंद नव्हते. तांत्रिक कारणामुळे स्क्रीनवर दोन कॅमेऱ्यांचे डिस्प्ले बंद होते. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतात. वीज गेली तरी बॅंकअपची व्यवस्था आहे. त्यामुळे ते बंद राहूच शकत नाही. सीसीटीव्हीचे सर्व फुटेज मागविण्यात आले आहेत. हा सर्व रेकॉर्ड त्यांना दाखविण्यात येईल. त्यांच्या तक्रारीची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. दोन अधिकाऱ्यांकडून खुलासाही मागविण्यात आला आहे. स्क्रीन बंद असल्याचे व्हिडिओ कुणी काढला, त्याचे इंटेशन काय होते, याचीही तपासणी करण्यात येईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यापूर्वी सी स्क्रीन बंद असल्याची तक्रार सी व्हिजिलच्या माध्यमातून आली असल्याचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी सांगितले.दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमधील सीसीटीव्ही बंद असल्याचा व्हीडिओ कुणी काढला याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिल्यानंतर शुक्रवारी अज्ञात व्यक्तीविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...