Tuesday 26 March 2019

सराईत पाकिटमार महिलेस अटक




गोंदिया ,दि.26ः- रेल्वे स्थानक परिसरात तसेच रेल्वे प्रवासात लहान मुलांना चोरणारी तसेच पाकिटमार करणारी टोळी सक्रीय असल्याच्या आधारावर रेल्वे सुरक्षा बलच्या टास्कफोर्सने विशेष मोहीम राबविली. दरम्यान, गोंदिया रेल्वे स्थानकावर एक महिला संशयास्पद स्थितीत आजाद हिंद एक्सप्रेसमध्ये चढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 या महिलेची कसून चौकशी केली असता, तिच्याकडे एटीएम, मोबाईल, लायसन्स, आधार कार्ड सापडले. दरम्यान, संबंधित कार्डधारकांशी संपर्क केले असता, ते चोरून नेल्याचेही उघडकीस आले. यावरून सदर सराईत पाकिटमार महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २३ मार्च रोजी दुपारी १२.१५ वाजता करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सोनी पिटर पी. एसबू (३0, रा. विजयावाडा, आंध्र प्रदेश) असे आहे. सदर महिला मुलांच्या चोरी प्रकरणातही सहभागी असल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रवासदरम्यान प्रवाशांचे पाकीट, मोबाईल व इतर साहित्य चोरी करणे तसेच लहान मुलांना चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती रेल्वे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांना प्राप्त झाली. या आधारावर टास्कफोर्सच्या माध्यमातून २२ व २३ मार्च रोजी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, २३ मार्च रोजी आजाद हिंद एक्सप्रेसमध्ये एक महिला संशयास्पद स्थितीत चढताना दिसून आली. या आधारावर तिला ताब्यात घेण्यात आले असता तिच्यासोबत असलेले लहान मुले पी. प्रेम व पी. चंदू या दोघांची दिशाभूल करीत असल्याचेही समोर आले. महिला सुरक्षा बलची कर्मचारी रजनी शर्मा हिने तिची तपासणी केली असता, तिच्याजवळ एटीएम, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, आयडी व दोन पर्स यामध्ये १९00 व १५00 रुपये आढळले. यावरून संबंधित ओळखपत्रातील फिर्यादी चंद्रभान बावणे रा. नागपूर, अविनाश बारेवार रा. गोंदिया या दोघांशी संपर्क केले असता, त्यांचे पर्स चोरी गेल्याचे समोर आले. दोन्ही फिर्यादीची गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा होती. यामुळे सदर महिला सराईत पाकिटमार व मुलांना चोरी करणार्‍या टोळीतील सक्रिय सदस्य असल्याची बाब समोर आली. या आधारावर आरोपी महिला सोनी पिटरच्या विरूद्ध गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई रेसुब व टास्कफोर्सचे उपनिरीक्षक विनेश मेश्राम, एम.बी. साहू, पी. दलाई, व्ही.आर. मडावी, आर. रायकवार, पी.एल. पटले, रजनी शर्मा यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...