Monday, 18 March 2019

सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला पडला विसर

गोंदिया,दि.18 : सकाळी साडेसहानंतर डोंगरगड-इतवारी ही गाडी सुटल्यानंतर गोंदिया स्थानकातून इतवारीकडे धावणारी कोणतीही लोकल गाडी नाही. थेट सायंकाळी ४ वाजतानंतर बालाघाट-इतवारी ही गाडी आहे. मात्र, ही गाडी कधीही वेळेत धावत नाही. त्यामुळे प्रवाशांना सकाळपासून सायंकाळपर्यंत ताटकळतच राहावे लागते. रेल्वेच्या या दुटप्पी कारभारावर सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाची ओळख आहे. या रेल्वे स्थानकावरून नागपूर आणि रायपूरच्या दिशेने सुपर फास्ट एक्स्प्रेस, एक्स्प्रेस, लोकल गाड्या धावतात. अनेक गाड्यांचा या स्थानकावर थांबा आहे. त्यातल्या त्यात प्रवासी भाडे कमी तसेच प्रवास सुखकर असल्याने बहुतांश प्रवासी रेल्वे प्रवासाला अधिक पसंती देतात. गोंदिया ही व्यापारी नगरी आहे. त्यामुळे गोंदिया ते इतवारी या मार्गावरील गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिक कामानिमित्त गोंदियाला येत असतात; परंतु कामे आटोपून दुपारी गावाकडे परतीची वाट त्यांना धरता येत नाही. याला कारणही तसेच आहे. २२ फेब्रुवारीपासून गोंदिया – इतवारी ही दुपारी ३.१५ वाजता फलाट क्रमांक ७ वरून सुटणारी गाडीला बालाघाट-इतवारी केल्याने गोंदियातील प्रवाशांची कुचंबणा झाली आहे . या गाडीची बालाघाटवरून गोंदियाला येण्याची वेळ सायंकाळी ४ अशी आहे. फलाट क्रमांक ६ वरून ही गाडी सुटते. मात्र, ही गाडी सुरू झाल्यापासून कधीही वेळेत धावली नाही. सायंकाळी ५ किंवा ६ च्या नंतरच ही गाडी गोंदिया स्थानकातून सुटत असते. त्यामुळे सकाळी ६.३० वाजतानंतर डोंगरगड-इतवारी ही गाडी सुटल्यानंतर सायंकाळापर्यंत कोणतीही लोकल गाडी या मार्गावरून धावत नाही. सकाळी १० ते १०.३० च्या मध्ये धावणारी दुर्ग-इतवारी ही गाडीदेखील मध्येच बंद केली जात असल्याने लहान थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना सायंकाळपर्यंत ताटकळत राहावे लागते. दरम्यान, लोकल गाड्या धावण्याच्या सोयीचा विसर पडलेल्या रेल्वेच्या कारभारावर सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सकाळपासून दुपारपर्यंत किमान एक-दोन लोकल गाड्या रेल्वेने सुरू कराव्यात, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे..

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...