Saturday, 9 March 2019

शरद पवार, अजित पवार यांना दिलासा

मुंबई : साखर कारखाने विक्री घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोपांत तथ्य नाही. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असे ईओडब्ल्यूने अहवालात म्हटले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.
पुणे ईओडब्ल्यूने राजकीय दबावातून शरद पवार, अजित पवार अन्य नेत्यांना क्लीन चिट दिल्याचा आरोप अण्णा हजारे यांचे वकील सतीश तळेकर यांनी मुख्य न्या.नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे केला. आजारी साखर कारखान्यांचे जाणूनबुजून पुनरुज्जीवन न करता अगदी किरकोळ किमतीत त्याची विक्री करून शरद पवार, त्यांचे पुतणे अजित पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप अण्णा हजारे यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे.
उच्च न्यायालयाने याबाबत तपास यंत्रणेने काय पावले उचलली ? याबाबत विचारणा केली होती. त्यावर हजारे यांचे वकील तळेकर यांनी पोलिसांनी काहीही केले नसल्याची माहिती दिली. मात्र, सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी पुणे ईओडब्ल्यूने २०१७ मध्येच प्रकरणाची चौकशी बंद केल्याची माहिती न्यायालयाला दिली. 'याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नाही' असे शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एक याचिका दाखल असून त्या याचिकेनंतर काय कारवाई केली, याची माहिती घेण्यासाठी न्यायालयाने सर्व याचिकांवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...