Friday, 22 March 2019

साधे जेवण १०० तर नॉनवेज २००; उमेदवारांसाठी मेनूकार्ड

गोंदिया,दि.20ः- साधे जेवण १०० रुपये, नॉनवेज २००, नास्ता २५, शीतपेय २०, कॉफी १२ आणि चहा ७ रुपये…. कुठल्याही हॉटेलचे हे मेनूकार्ड नसून निवडणूक आयोगाने लोकसभेच्या उमेदवारांसाठी नेमून दिलेले हे दरपत्रक आहे. खर्च लपविण्यासाठी वेगवेगल्या क्लुप्त्या करणाऱ्या उमेदवारांवर वॉच ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ही खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याचेही या दरपत्रकावरून दिसून येते.

लोकसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने ७० लाखांची मर्यादा आखून दिली आहे. या मर्यादेपलीकडे खर्च करणाऱ्या उमेदवारावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागते. निवडणूक आयोगाच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवित असतात. निवडणुकीत होऊ द्या खर्च म्हणत उमेदवारांकडून अनियंत्रित खर्च करण्याची मानसिकता बळावते. या मानसिकतेवर नियंत्रण मिळविण्यासाठीच निवडणूक आयोगाने विविध वस्तूंची दरसूची तयार केली असून राजकीय प्रतिनिधींच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवडणुकीतील खर्चाचे दर (रुपयांत)
मेनू : २००९ : २०१४ : २०१९
साधे जेवण : ४० : ७५ : १००
नॉनवेज : ५० : १५० : २००
नास्ता : १० : २५ : २५ : २५
शीतपेय : १० : १५ : २०
कॉफी : ५ : १० : १२
चहा : ३ : ५ : ७
सर्वांना समान संधी
सभा, रॅली, जाहिराती यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जोतो. खर्च लपविण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या क्लृप्त्या करताना दिसतात. पैशांच्या भरवश्यावर उमेदवार अधिक सक्षम बनू नये, सर्वांना समान संधी मिळावी यासाठी उमेदवारांच्या खर्चावर बंधणे घालण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ७० लाख आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला २८ लाखापर्यंत खर्चाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. अंतिम खर्च म्हणून उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यात संपूर्ण खर्च आणि खर्चाच्या स्त्रोतचाही उल्लेख करावा लागतो.
तर होणार कारवाई
उमेदवारांनी खर्च सादर न केल्यास भारतीय निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १० ए नुसार उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे आता उमेदवाराला याच मर्यादेत खर्च सादर करणे बंधनकारक राहणार आहे. उमेदवारांना निवडणूक खर्च करण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते काढण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र काही उमेदवारांनी या व्यतिरिक्त दुसऱ्या खात्यातून खर्च करत असल्याचेही आढळून येते, अशा उमेदवारांना नोटीस पाठविण्यात येते.

इथे वाढली महागाई
२००९ लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या खर्चाच्या दरसूचीच्या तुलनेत २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेले दर दुप्पट, तिप्पट तर काही वस्तूंचे दर तर चौपट वाढले होते. महागाई वाढली नसल्याचे दावे करण्यात येत असले तरी निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या दरपत्रकाकडे बघितले तर गेल्या पाच वर्षांत अनेक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...