आल्लापली,दि. ४ :पुलवामा हल्ल्यात ४३ जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसभा घेत होते. पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर जात असताना दुसऱ्या कोणत्याही हेलिकॉप्टरला त्या मार्गाने जाता येत नाही. त्यांच्यामुळेच शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरापर्यंत पोहचण्यास विलंब झाला. मग, पंतप्रधान आणि भाजपवाले देशभक्त कसे, असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी काल आल्लापली येथे केला.
ते अहेरी उपविभागातील कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.नितीन कोडवते, डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, हसन गिलानी, समशेर पठाण, यशवंत दोंतुलवार, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, रवींद्र शहा, रहीम भाई, मुश्ताक हकीम, बंडू आत्राम उपस्थित होते.
आ.विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, देश इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा एकही भाजपवाला स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हता. इंग्रजांची चापलुसी करणारे हे लोक आहेत. देशात जेव्हा सुई तयार होत नव्हती; तेव्हा काँग्रेसने अग्निी ब्रम्हास्त्र तयार केले. म्हणून हा देश सुरक्षित आहे. काँग्रेसचे सरकार असताना भाजपवाले पंतप्रधानांचा राजीनामा मागायचे. आता मोदी राजीनामा का देत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.पुलवामा हल्ल्यात साडेतीनशे किलो स्फोटकांचा वापर झाला. तेव्हा मोदी आणि भाजपवाले झोपले होते का. देश सैनिकांनी सुरक्षित ठेवला आहे. परंतु हे स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. आंतरराष्ट्रीय करारामुळे व संपूर्ण देशवासी ‘अभिनंदन’च्या पाठिशी राहिल्याने ते सुटले, मोदींमुळे नाही, अशी टीकाही त्यांनी केली. पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे पार्थिव देह मोदींच्या प्रचारसभेमुळे उशिरा पोहचले, मग, हे कसले देशभक्त, असा संतप्त सवालही श्री.वडेट्टीवार यांनी केला.
दोन कोटी बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. गॅस सिलिंडरचे भाव वाढवले. गॅस दिल्यानंतर रॉकेल बंद केला. काँग्रेस पक्ष संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना ६०० रुपये देत होता.. तेव्हा भाजपवाल्यांनी दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता पैसेच मिळत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. साखर, तेलाचेही भाव वाढविले. आदिवासींच्या हक्कामधून धनगरांना सवलती देता येणार नाही, असे ठणकावत श्री.वडेट्टीवार यांनी अहेरी उपविभागातील घरकुल लाभार्थींना यंदा दुसरा हप्ता मिळाला नाही, तसेच ओबीसी, दलितांची शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थी अडचणीत आल्याचे सांगितले.याप्रसंगी पाच तालुकाध्यक्षांनी विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार, प्रवक्ते अतुल लोंढे व जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांचा सत्कार केला. संजय चरडुके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
No comments:
Post a Comment