गोंदिया,दि.0५ : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर देवरी-राजनांदगाव या दोन शहरांच्या मध्य ठिकाणी सळाखी घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला अडवून चालक व वाहकाला बंधक बनवून ट्रेलर पळविल्याची घटना २२ फेब्रुवारीला घडली. या घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. देवरी पोलिसांसोबतच पोलीस अधिक्षकांच्या आदेशावर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला. दरम्यान ४ दिवसात टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. या टोळीतील ५ आरोपीना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २७ लाख ८३ हजार ७१३ रुपयांच्या मालापैकी १७ लाख २३ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती आहे. इदरीश हुसैन डोडीया (४२) रा. आमगाव, नफीस अली मो. हनीफ (२५) रा. मैना ता.राणीगंज (उत्तरप्रदेश), संजू धर्मराज येळे (४१), बबलू शंकर बारसे (३८) दोन्ही रा. आमगाव प्रोफेसर दयानारायण क्रिपाण (४५) रा. मुजरा ता. लाखांदूर जि.भंडारा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
गोंदिया पोलिसांनी ट्रेलर पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. दरम्यान अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपीची कसून चौकशी केली असता. देवरी येथील घटनेपूर्वी १५ जानेवारीला छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यातील मुरुंद पोलीस ठाण्यांतर्गत आणखी एक ट्रक पळविल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे या आंतरराज्यीय टोळीमध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्राप्त माहितीनुसार, प्रितम ट्रान्सपोर्ट कंपनी, भिलाई (छत्तीसगड) या कंपनीचे ट्रेलर क्र.सीजी ०७/सीए ०९५७ बुट्टीबोरी येथील मिनाक्षी रोलिंग मिल येथून २१ फेब्रुवारीला २२ टन लोेखंडी सळाखी भरुन भिलाईला जाण्यासाठी निघाला. २१ व २२ फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर एका कारने ट्रेलरचा पाठलाग करुन देवरी ते राजनांदगाव दरम्यान ट्रेलरला अडविले. त्यातच आरोपीनी ट्रेलरचालक व वाहकाला ताब्यात घेऊन कारमध्ये बसविले तर काही आरोपी सळाखीसह ट्रेलर घेवून पसार झाले. दुसरीकडे ट्रेलरचालक व वाहकाला जवळपास २ तास कारमध्ये डांबून ठेवण्यात आले. पहाटेदरम्यान छत्तीसगड राज्यात राष्ट्रीय महामार्गावरील झाडाला त्या दोघांना बांधण्यात आले. आरोपींच्या तावडीतून सुटलेल्या चालक व वाहकाने छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या तुमडीबोड पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. मात्र, घटना देवरी पोलीस स्टेशनअंतर्गत घडल्याने तेथील पोलिसांनी देवरी येथे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ट्रकचालक शिवगोपालसिंग व वाहक प्रदीप कुमार पटले या दोघांनी देवरी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार केली. दरम्यान देवरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, तर दुसरीकडे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक हरीष बैजल यांनी देखील या घटनेची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेलाही तपास कार्याची धुरा सोपविली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांनी सहकाऱ्यांसह तपासकार्याला सुरुवात केली. बुट्टीबोरी येथून ट्रक रवाना झाल्यापासून सर्व माहिती घेण्यात आली. दरम्यान ट्रकच्या मागे एमएच ३५/पी-१६१६ ही कार पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास आले. यावरुन कारमालक इदरीश हुसैन डोडीया (४२) रा. आमगाव याला ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर त्याचा एक सोबती नफीस अली मो. हनीफ (२५) रा. मैना, राणीगंज (उ.प्र.) यालाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी ट्रेलरला पळविल्याची कबुली दिली.त्यातच भंडारा जिल्ह्यातील मोजरा येथील प्रोफेसर दयानारायण क्रिपाण याला माल विक्री केल्याचेही त्यांनी कबुली दिली. यावरुन ट्रेलरसह १७ क्विंटल सळाखी ताब्यात घेण्यात आली. याबरोबर आरोपी संजू धर्मराज येळे, बबलू शंकर बारसे दोन्ही रा. आमगाव या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली.एकंदरीत या घटनेत आरोपींनी २२ टन लोखंडी सळाखी (किंमत १२ लाख ८३ हजार ७१३ रुपये) व ट्रेलर असा एकूण २७ लाख ८३ हजार ७१३ रुपयांचा माल लंपास केला होता. यापैकी १७ लाख २३ हजारांचा माल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. जवळपास ७.५ क्विंटल सळाखी आरोपींनी अफरातफर केली. मात्र, तोही माल आरोपींकडून हस्तगत करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस विभागाकडून प्राप्त आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस हवालदार राजकुमार पाचे, विजय रहांगडाले, सुखदेव राऊत, मधुकर कृपाण, चंद्रकांत करपे, भुवनलाल देशमुख, तुळशीदास लुटे, मेवालाल भेलावे, विजय शेंडे, रेखलाल गौतम, अजय रहांगडाले, चित्रांजन कोडापे, भागवत दसरिया, मुरली पांडे, विनोद गौतम यांनी पार पाडली.
No comments:
Post a Comment