Monday 25 March 2019

भंडारा-गोंदिया मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नैराश्य


प्रफुल पटेलांनी मतदारसंघ सोडला वाऱ्यावर

गोंदिया,दि.25- लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून माजी केंद्रीय मंत्री आणि खा. प्रफुल्ल पटेल हे निवडणूक लढविणार, असे तर्क लढविले जात होते. या संदर्भातील अनेक बैठकांतून असेच संकेत मिळत असताना आज अखेरच्या दिवसी अचानक प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांना धक्का देत भंडाराचे नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली. परिणामी, राष्ट्रवादीसह काँंग्रेसच्या गोटात नैराश्य आणि संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, खा.प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघाचे पालकत्व सोडून या मतदार संघाला वाऱ्यावर तर सोडले नसावे ना, अशा प्रतिक्रिया सुद्धा आता उमटत आहेत.
भंडारा मतदार संघात भाजप या प्रतिस्पर्धी पक्षाच्या वतीने भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अंतिम क्षणापर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता. परिणामी, राष्ट्रवादी तर्फे खा. पटेल हेच रिंगणात राहतील, अशी आशा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये होती. यापूर्वी या मतदार संघातून अनेकदा पटेल यांना मतदारांनी संधी दिली.जातीय समीकरण काहीही असले तरी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादीची साथ पकडलेल्या प्रफुलभाईंना मतदारांनी सोडले नाही. अपवादात्मक परिस्थितीच पटेल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस सोडल्यानंतर प्रफुल भाईवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी या दोन्ही जिल्ह्यात जिवंत ठेवता आली. अन्यथा हा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नाही तर कॉग्रेसचे प्राबल्य आहे. भाईजींवरील असलेल्या प्रेमापोटी येथील मतदार हा जातीपातीच्या समीकरणांवर मात देऊन प्रत्येकवेळी भाईजींच्या पाठीशी खंबीर उभा राहिला असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.
असे असताना पटेल यांनी भाजपच्या प्रभावाला घाबरत स्वतः रिंगणातून माघार घेतल्याचे आता प्रतिस्पर्धी बोलू लागले आहेत. त्यांच्या या आरोपाला आता उत्तर देताना राष्ट्रवादीची दमछाक होणार आहे. भंडाराचे नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी देण्यामागचे असलेले तर्क हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पचनी पडले नसल्याने त्यांच्यामध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे.
काही कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, जर नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी द्यायचीच होती, तर एवढा वेळ हा विषय ताणून धरण्याचे काही कारण नव्हते. खरे तर पक्षाला निवडणुकीसाठी होकार देऊन ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून पटेल यांनी माघार घेत स्वतःच्या कार्यकर्त्यांचीच फसवणूक केल्याचा समज आता राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा झालेला दिसून येत आहे. निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवाराशी तुलना केली तर अत्यंत दुबळा आणि आजारी उमेदवार देण्याचे कारण न समजण्यापलिकडे असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहे. काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तर आता भाईजींनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याला वाऱ्यावर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा भाजपच्या तुलनेत अत्यंत दुबळा मानला जात असल्याने राष्ट्रवादीने प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी नांगी टाकल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...