Tuesday 26 March 2019

दारूबंदी करणार्‍या दोन महिलांचे जाळले घर

गोंदिया,दि.26ः-छोटा गोंदिया व संजयनगर परिसरात अवैध दारू विक्रीसाठी काही महिलांनी कंबर कसली. दरम्यान, अवैध दारू विक्रेत्यांना दारू विक्री करू नये, अशी सूचनाही अनेकदा केली. एवढेच नव्हे तर पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. मात्र, अद्यापपयर्ंत संजयनगरात अवैध दारू विक्री सुरूच आहे. दुसरीकडे दारू विक्रीचा बंदोबस्त होत असल्याचे लक्षात घेऊन काही अवैध दारू विक्रेत्यांनी विरोध करणार्‍यांच्या घरी उपद्रव करण्याचा प्रकार सुरू केला आहे. २३ मार्च रोजी रात्री दोन घरांना आग लावण्यात आली. दरम्यान, दोन्ही घरातील दुचाकी जळून खाक झाले व मोठे नुकसान झाले. या प्रकाराला घेऊन (ता.२४) संजयनगर येथील शेकडो महिलांनी शहर पोलिस स्टेशन गाठून अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली.
संजयनगर, छोटा गोंदिया, गोविंदपूर परिसरात दारू विक्रीमुळे शांतता व सुव्यवस्था भंग होत आहे. बच्चेकंपनी व्यसनाच्या आहारी जात आहेत. दारू व्यसनामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी महिलांनी गेल्या ८ महिन्यांपासून पुढाकार घेवून परिसरात दारूबंदीची हाक दिली. दरम्यान, परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांना दारू विक्री करू नये, अशी विनंतीही केली. एवढेच नव्हे तर शहर पोलिस स्टेशन, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन परिसरात दारूबंदीला सहकार्य करावे, अशीही विनंती करण्यात आली. मात्र, दारूबंदी होत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील महिला दररोज रात्री गस्त घालतात. त्यामुळे दारूविक्रेता आणि दारू ढोसणार्‍यांचा मज्जाव होत आहे. या प्रकाराला कंटाळून आता अवैध दारूविक्रेत्यांनीच दारू विक्रीचा बंदोबस्त करणार्‍या महिलांच्या कुटुंबाविरोधात उपद्रव सुरू केला आहे. (ता.२३) संजयनगर येथील कैलाश चव्हाण हे कुटुंबासह बाहेर गेले असताना त्यांच्या घराला आग लावण्यात आली. त्याचबरोबर सुरेश गडपायले हे कुटुंबासह घरी झोपले असताना यांच्याही घराला आग लावण्यात आली. अंगणात ठेवलेल्या दोन्ही कुटुंबातील मोटारसायकलींना आगीच्या स्वाधीन करण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेवून आगीला आटोक्यात आणले. मात्र, तोपयर्ंत दोन्ही दुचाक्या जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, काही लोकांनी आग लावून पळ काढताना काही लोकांनादेखील पाहिले. यावरून दारू विक्रेते षडयंत्र रचून नासधूस करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकाराला घेवून (ता.२४) दुपारी १२ वाजता सुमारास संजयनगर, छोटा गोंदिया, गोविंदपूर येथील शेकडो महिलांनी शहर पोलिस ठाणे गाठून अवैध दारू विक्रेते व त्यांना अभय देत असलेल्या पोलिसांविरूद्ध चांगलाच संताप व्यक्त केला. अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी महिलांनी लावून धरली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...