गोंदिया,दि.11 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्यामार्फत जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील तालुका विधीसेवा समित्यामार्फत सर्व तालुका न्यायालयामध्ये ९ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या सुधारित पत्रानुसार सदर राष्ट्रीय लोकअदालत ९ मार्चऐवजी आता १७ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्ट कलम १३८, बँक रिकव्हरीची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे- भाडे, बँक वसुली, प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बिलाची (चोरीची प्रकरणे सोडून) तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे. तरी ज्या पक्षकारांना आपली दाखल प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीकरिता ठेवायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात आपला अर्ज सादर करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणाकरिता सर्व बँकांनी, संबंधितांनी किंवा अर्जदारांनीसुद्धा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे किंवा तालुका विधीसेवा समितीकडे अर्ज सादर करावा. सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तत्काळ निकाली काढून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधुरी आनंद, प्रभारी अध्यक्ष, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि एम.बी.दुधे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांनी केले आहे
No comments:
Post a Comment