Saturday, 9 March 2019

नागपूरात गडकरींना टक्कर देणार काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलें ?

नागपूर,दि.08 : केंद्रीय वाहतुक परिवहन मंत्री आणि भाजपाचे ‘हेवीवेट नेते संघाचे सक्रीय कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून काँग्रेसने भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोलेंना रिंगणात उतरविण्याचा निर्णय दिल्लीच्या पातळीवर आज घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पटोलेंना आपण निवडणुक लढण्यास इच्छुक आहात का असे विचारले असता त्यांनी होकार दिल्याने त्यांचे नाव नागपूरात गडकरीच्या विरोधात लढण्यासाठी छाननी समितीने मंजुर केल्याचे बोलले जात आहे.आज शुक्रवारी दिल्लीत दिवसभर चाललेल्या घडामोडीनंतर छाननी समितीने पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे.नागपूरातील गटातटात विभागलेल्या काँग्रेसला संघटित करुन पटोलेंच्या माध्यमातून ही निवडणुक लढण्याचा मानस काँग्रेसने केला आहे.पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर उघड टीका करीत भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे त्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभेची जागाही भाजपाला गमवावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. तेव्हापासून पटोले हे सातत्याने भाजपा नेत्यांना लक्ष्य करीत नागपुरातून लढण्यास सज्ज असल्याचे सांगत होते.
२०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. मुत्तेमवार यापूर्वी नागपुरातून चार वेळा विजयी झाले होते. मात्र, गेल्यावेळच्या पराभवानंतर पक्षाने नवा चेहरा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आली होती. शेवटी मुत्तेमवार यांनी एक पाऊल मागे सरत पटोले यांचे नाव समोर केले. असे असले तरी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचेही नाव चर्चेत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुत्तेमवार गटाने पटोले किंवा ठाकरे अशी भूमिका घेतली होती तर अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी गुडधे यांच्या नावाला पसंती दिली. दरम्यान, पटोले यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी व महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत नागपुरातून लढण्याची तयारी दर्शविली. यानंतर झालेल्या पक्षाच्या छाननी समितीच्या बैठकीत पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा पटोले समर्थकांनी केला आहे. पटोले यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. आपण छाननी समितीला आपला होकार कळविला आहे, प्रदेश प्रभारी खरगे यांच्याशी बोलणे झाले आहे, पक्षाने आदेश दिला तर लढण्यास सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...