मुंबई, (शेखर भोसले) दि.28 - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच हे वर्ष कविवर्य ग.दि.माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके आणि लेखक पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. या दुग्धशर्करा योगावर भांडुप कलाकार कट्टा तर्फे एकपात्री नाट्यप्रयोग, कविता सादरीकरण, मराठी कथा अभिवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन (अखिल बुक्स सर्विसेस ह्यांच्या सौजन्याने) बुधवार(दि.२७) सायं. ६:०० ते ९:०० ह्या वेळेत कोकण नगर व्यायम शाळा पटांगण, भांडुप (प.) येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाअंतर्गत भांडुप कलाकार कट्ट्यातील नवोदित कवी हर्षद सुतार, अतुल गुरव, नीलेश वायंगणकर, अशोक परब, श्रुती घोसाळकर, सुप्रिया सुर्वे, नीलम, मनोमय , अनघा हडकर सौ.लक्ष्मी मुंढे यांच्या कविता सादर करण्यात आल्या. तसेच काही नाट्यप्रवेश, स्वगत, अभिवाचन देखील सादर करण्यात आले.नाट्यरसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपरोक्त कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच अखिल बुक्स सर्विसेस ह्यांच्या सौजन्याने आयोजित ख्यातनाम साहित्यिकांच्या पुस्तक प्रदर्शनाचा देखील वाचन प्रेमी भांडुपकरांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाला जेष्ठ नाट्य, सिने अभिनेत्री, लेखिका, कवीयत्री सौ. ज्योती निसाळ, ‘अप्सरा आली फेम’ ऋतुजा प्रमोद राणे, साहित्यिक डॉ. विवेका टाकळे, अभिवाचक – स्वप्नील फडके, गायक- प्रसाद पटवर्धन या प्रमुख अतिथींची उपस्थिती लाभली. भांडुप मधील राजकारण, समाजकारण आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हे देखील या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते.भांडुप कलाकार कट्ट्याच्या कलाकारांनी एकत्र येवून भांडुपमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त प्रथमच अश्या प्रकारचा एक सुंदर साहित्यिक कार्यक्रम साजरा केला याबद्दल ह्या कट्ट्याच्या कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी निवेदक, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, कवी, लेखक आणि इतर सर्व कलाकारांनी गेले काही दिवस प्रचंड मेहनत घेतली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात भांडूप कलाकार कट्ट्याचे अध्यक्ष श्री महेश तावडे व त्यांचे इतर साथीदार सर्वश्री विश्राम चव्हाण, नयन पडवळ, रोहन सवने, समीर नार्वेकर, अभिजित महाडिक, सुहास बागवे, निखिल चव्हाण, संदीप मसूरकर, जयेश चाळके, नीलेश गुंडाळे, राजेश आयरे, प्रथमेश कदम, प्रणय शेट्ये, प्रमोद राणे, पूर्णिमा पोळ, मीनाली महागावकर, गीता सूर्यवंशी, शुभांगी कांबळे, इत्यादी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment