Wednesday 7 December 2016

शिक्षकाला ‘फेसबुक फ्रेंडशीप’ पडली महागात,३० लाखांची फसवणूक

रिसोड (वाशिम), दि. 7 - परदेशी फेसबुक मैत्रिणीने भारतात वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या तिच्या व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून ३० लाख रुपयाने फसवणूक केल्याची तक्रार रिसोड तालुक्यातील करडा येथील शिक्षक निवृत्ती हिरामन धांडे यांनी रिसोड पोलीस स्टेशनला केली. यावरून पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अमेरिकन नागरिक सर्जट मेसी डोनाल्ड व अन्य १० जणांविरूद्ध कलम ४२०, ३४ भादंवी ६६ (अ) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
 
निवृत्ती धांडे यांच्या तक्रारीनुसार १५ फेब्रुवारी २०१६ रोजी अमेरिकन नागरिक असलेल्या सर्जंट मेसी डोनाल्ड सोबत त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. तिने यूनायटेड नेशन आॅर्गनायझेशन सिरिया डिव्हिजनमध्ये सैन्यात असल्याचे सांगून तिचा स्वत:चा ५.६ मिलीयन अमेरिकन डॉलरचा फंड भारतामध्ये वेगवेगळ्या व्यवसायात गुंंतवणूक करण्याची इच्छा धांडे यांच्याकडे व्यक्त केली होती तसेच धांडे यांना भारतातील कायदेशीर हक्कदार म्हणून जबाबदारी पार पाडण्याची विनंती केली.
 
इ-मेलद्वारे तिने सदर रक्कम गुंतवणुकीसाठी धांडे यांच्या बँक खात्यात जमा करण्याची आणि या रकमेतील ५० टक्के वाटा देण्याचे कबूल केले. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सदर फंड असलेली पार्सल बॅग रेड क्रॉस सिक्यूरिटी एजन्सी इराकमार्फत रेडक्रॉस जेटने इराकी डिल्पोमॅट मार्क डेव्हीड यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे आणली, अशी सूचना मेसी डोनाल्ड हिने केली. त्यानंतर रॉयल बँक आॅफ स्कॉटलॅण्ड नवी दिल्ली येथे पार्सल बॅग विमानतळाचे चार सुरक्षा रक्षक व मार्क डेव्हिड यांनी नेली, असे सांगण्यात आले. रॉयल बँक आॅफ स्कॉटलॅण्ड नवी दिल्लीचे प्रमोद गिला यांनी रॉयल बँक आॅफ स्कॉटलॅण्ड नवी दिल्ली येथे आॅनलाईन खाते उघडण्याची सूचना केली. फंड ट्रान्सफरची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रक्कम पाठविण्याचे सांगितले.
 
यानुसार सुरूवातीला ४८ हजार ७५० रुपये पाठविले, असे धांडे यांनी तक्रारीत नमूद केले. फंड ट्रान्सपरच्या नावाखाली वारंवार रक्कम पाठविण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करीत गेलो. २२ फेब्रुवारी ते आॅगस्ट २०१६ पर्यंत जवळपास ३० लाख ९१ हजार २०० रुपये पाठविले. त्यानंतर डेव्हिड मार्क हा २५ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतात आला आणि ७० हजार रुपये परत पाठविण्याची सूचना केली. यावेळी भारतात नोटाबंदी असल्याने ३० डिसेंबरपर्यंतची वेळ मागून घेतली, असे धांडे यांनी तक्रारीत नमूद केले. यानंतर संबंधितांकडून फंड ट्रान्सपर किंवा भारतातील वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या व्यवसायाबाबत काहीच हालचाली दिसून आल्या नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने धांडे यांनी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीहून पोलिसांनी सर्जट मेसी डोनाल्ड व अन्य १० जणांविरूद्ध कलम ४२०, ३४ भादंवी ६६ (अ) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...