
पुणे,06-'आपलं सरकार, कामगिरी दमदार'चा नारा देणाऱ्या राज्यातील भाजप सरकारने 'मी लाभार्थी'ची जाहिरात करणाऱ्या आणखी एका लाभार्थ्याच्या गौप्यस्फोटामुळे तोंडघशी पडले आहे. रईसा शेख असं या लाभार्थी महिलेचं नाव आहे.
२०१३ मध्येच रईसाला महा-ई-सेवा केंद्र मिळाले. भाजप सरकारनं आपल्याला आधार केंद्र दिलं होते. मात्र, दोन महिन्यापूर्वी तेही काढून घेतल्याचे सांगत रईसा यांनी सरकारची पोलखोल केली. त्यामुळे भाजप सरकार काँग्रेसच्या काळातील लाभार्थींच श्रेय घेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील पुरंदरचे शेतकरी शांताराम कटके यांना शेततळी दिल्याचा खोटा दावा केल्याची बातमी ताजी असतानाच रईसा शेख यांनी आपण या सरकारचे लाभार्थी नसल्याचं सांगितल्याने सरकारची कोंडी झाली आहे. चार वर्षापूर्वी २०१३ मध्ये आपल्याला तत्कालिन सरकारने महा-ई-सेवा केंद्र मंजूर केलं होतं. गुलटेकडी येथे हे केंद्र सुरू असून त्यातून जातीचा दाखला, रहिवासी दाखला आदी चार-पाच सेवा दिल्या जात असल्याचे रईसा शेख यांनी सांगितलं.
राज्यसरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे फोटो जाहिरातीत वापरण्याचा धडका सरकारने लावला आहे. मात्र रईसा शेख यांचा अनुभव काही वेगळाच आहे. रईसा यांनी महा-ई-सेवा केंद्र सुरू असतानाच त्यांनी विद्यमान सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ घेत आधार केंद्रही सुरू केलं. त्यातून त्यांना दिवसाला हजार रूपये मिळू लागले. कामाचा पसारा वाढल्याने त्यांनी काही कामगारही कामाला ठेवले. सर्व काही सुरळीत असताना दोन महिन्याआधी त्यांना आधार केंद्राची नोडल एजन्सी बदलली असल्याचं सांगण्यात आलं. नोडल एजन्सी बदलल्याने आधारचं काम बंद करत असल्याचंही त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या आधार केंद्राचं काम ठप्प झालं आहे. जिथं आम्ही दिवसाला एक हजार रूपये कमावयचो, तिथं आता केवळ ३०० ते ४०० रूपयांचीच ऑर्डर मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment