लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सोमनूर संगम उपेक्षित
संगमावर गैरसोयींची रेलचेल
संगमावर गैरसोयींची रेलचेल
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.०१– इंद्रावती आणि गोदावरीचे संगम म्हणजे सोमनूर.. इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटाचे त्रिवेणी संगम म्हणजे भामरागड… तर वैनगंगा आणि वर्धा नद्यांचा संगम म्हणजे सिवनी…. या संगमस्थळी दोन वा अधिक प्रचंड गतिमान अशा खळाळत्या प्रवाहाचे एका बिंदूवर होणारे मिलन आणि त्यातून जन्मणारा नवा प्रवाह हा सागरात सामावून जाण्याच्या ओढीने पुढे धावायला लागतो. या संगमस्थानी दोन नद्यांच्या मिलनाचे निर्माण होणार भेदक आवाज हा पाण्याच्या शक्तीचा परिचय देण्यासाठी पुरेशा आहे. महाराष्ट्राची सीमा जिथे संपते आणि एका बाजूला नवनिर्मित तेलंगाणा तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगडच्या दिमाखदार डोंगररांगा यात भर घालणारे आणि गडचिरोली जिल्ह्याचे टोक असलेले सोमनूर येथे गोदावरी अंतर्धान पावणारी इंद्रावती या नद्यांचे संगम हे पर्यटनाचे सर्वोत्तम ठिकाण आहे. मात्र, राज्याच्या अंतिम टोकावर असलेले हे पर्यटन स्थळ जिल्हा निर्मितीनंतर उपेक्षित आहे. अतिदुर्गम आणि मागास भागाची शान असलेल्या स्थळाला उदासीन लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे ग्रहण लागले आहे. या पर्यटन स्थळाच्या आड खुद्द पालकमंत्री आणि स्थानिक खासदार असल्याचा आरोप होत असून या निसर्गस्थळाच्या मागे लागलेले राहू-केतू यांचा कालावधी कधीतरी संपणार किंवा नाही, अशी विचारणा नागरिक आणि निसर्गवाद्यांनी केली आहे.
सिरोंचा-जगदलपूर राष्ट्रीय महामार्गावरील असरअल्ली या गावापासून उजव्या बाजूला १० किलोमीटर अंतरावर हे संगम आहे. 'नदीकाठावर त्रिवेणी संगम' असे फलक लावून पर्यटकांसाठी थोड्याफार सुविधा केल्याचा कांगावा लोकप्रतिनिधींनी केला. मात्र, त्या स्थळी दुसèया जिल्ह्यातून व दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा,मार्गदर्शन,खाण्यापिण्याची सोय होईल, असे एकही कार्य न केल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. तिथे हातपंप जरी तयार करण्यात आला असला तरी त्या हातपंपातून पाण्याचा टिपूस देखील निघत नाही. असरअल्ली वरून सोमनूर संगमापर्यंतचा रस्ता हा रेतीमाफियांच्या वाहतुकीमुळे पूर्णतः उखडला गेल्या वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी विकासाच्या नावावर उदासीन असलेले लोकप्रतिनिधी सोमनूरच्या मार्गावर असलेल्या रेतीतस्करांच्या अड्ड्यावर जाऊन दोन तास आनंदात घालवून परत गडचिरोलीच्या दिशेने रवाना होतात. मात्र, त्या रेतीच्या ट्रकमुळे पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्थेकडे लक्ष देण्यासाठी त्यांचे कडे वेळ नाही. परिणामी, तो रस्ता दुरुस्त करून त्या रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नाशिक येथे ब्रम्हगिरीच्या पर्वत रांगांमध्ये थेंबा-थेंबाने उगम पावणारी गोदावरी संपूर्ण राज्याचा प्रवास करत मार्गात अनेक नद्यांना आपल्या कुशीत सामावून घेत इथवर येते. इथे तिचे पात्र अतिशय विशाल आणि प्रवाह देखील पट्टीच्या पोहणाèयालाही धडकी भरवणारा असाच आहे. बारमाही वाहणाऱ्या संपन्न अशा या नद्या गडचिरोली जिल्ह्याचे भूषण आहेत. अनेक संगमांसाठी परिचित असलेला हा जिल्हा राज्याच्या सीमा अधोरेखित करणाèया या संगमाच्या काही किलोमीटर आधी विस्तीर्ण अशा वैनगंगा आणि गोदावरीचा संगम होतो. दुसèया बाजूने येणारी इंद्रावती भामरागडजवळ आपल्या प्रवाहात पर्लकोटा आणि पामूलगौतम नदीला सामावून घेते, तो त्रिवेणी संगम. ही सर्व ठिकाणं पर्यटकांसाठी उत्तम पर्वणी ठरणारी अशीच आहेत. परंतु, या पर्यटनस्थळांचा विकास पर्यटकांच्या दृष्टीने न केल्याने याकडे पाहिजे त्याप्रमाणात पर्यटक पोचलेच नसल्याचे प्रत्यक्ष भेटीत बघावयास मिळाले.
सोमनूर हे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर असणारे छोटे गाव आहे. इथे देखील जुने सोमनूर आणि नवीन सोमनूर अशा दोन गावांमधून आपण या संगमापर्यंत पोहोचतो. सिरोंचा तालुका मुख्यालयाचे गडचिरोलीपासून २११ किमी अंतरावर आहे. रस्त्याने जाताना उंच-उंच माडाची झाडे आसमंतात दिमाखाने मिरवताना दिसतात. हा भाग महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग आहे. येथील कौलारू घरांची बसकी रचना आपणास लगतच्या तेलंगणा राज्यात असल्याचा आभास निर्माण करतात. या भागात आंध्रशैलीची पूर्ण छाप असून अध्र्यावर वस्ती तशीच आहे. येथे मोठ्याप्रमाणावर तेलगू भाषा बोलली जाते. यामुळे मराठी व हिंदी भाषिक पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महाराष्ट्र राज्यात असून आणि मराठी शाळा असून देखील गावखेड्यात मराठीच काय हिंदी भाषा सुद्धा बोलली जात नसल्याचे दिसून आले
हा भाग नद्यांनी वेढलेला असल्याने येथील जीवनशैलीवर त्याचा चांगलाच प्रभाव आहे. येथे मासे आणि झिंगे यांचा खाद्यपदार्थ म्हणून मुबलक वापर होतो. याठिकाणी गोदावरीच्या पात्रात सापडणारे झिंगे आकाराने खूप मोठे आहेत. या झिंग्यांना दूरवर मागणी आहे. येथील झिंग्यांच्या मेजवाणीवर ताव मारण्यासाठी मोठ्याप्रमाणावर इथे भेट देतात, हे उल्लेखनीय. वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतांना बांबूचे कुंपण सर्वत्र बघावयास मिळते.
No comments:
Post a Comment