मुंबई,दि.12राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात फेरबदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर 2017 रोजी, तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2017 रोजीच होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.सोबतच गोंदिया जिल्ह्यातील चार नक्षलग्रस्त तालुक्यात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार ठरविण्यात आल्याचे म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम 1 सप्टेंबर 2017 जाहीर केला होता. त्यानुसार 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार होते. मात्र 14 ऑक्टोबर 2014 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती.संबंधित विभागीय आयुक्तांकडून याविषयी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोर या चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी दुपारी केवळ 3 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील दुसऱ्या टप्प्यात 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार असल्याचे सहारियांनी सांगितले.
दुसऱ्या टप्यात 14 ऐवजी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319,सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 348 आणि गडचिरोली- 26.
No comments:
Post a Comment