Monday, 18 September 2017

शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी राज्यभर फिरणार-खा.पटोले


0yavatmal_1
टिटवीत घोषणा करण्याची घोषणा पोकळ ठरली
यवतमाळ,दि.18: जिल्ह्यातील टिटवी गावात जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या भाजपचे खासदार नाना पटोले यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे नानांचा फुसका बार ठरला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आपण राज्यभर दौरे करणार असल्याचे त्यांनी यावेळी झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत जाहीर केले. या दौऱ्यात मात्र स्थानिक भाजपचा एकही कार्यकर्ता फिरकला नसल्याने पक्षात ते एकाकी पडले हे स्पष्ट झाले असून पक्ष ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.यावेळी खासदार पटोले यांनी मानगावकर कुटुंबाला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
गेल्या काही दिवसांपासून खासदार पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा व महागाईवर त्यांनी दोन्ही सरकारांना जबाबदार धरले असून या दोन्ही सरकारांवर ताशेरे ओढण्याची संधी सोडली नाही.या पार्श्‍वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी (ता. घाटंजी) येथे जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे जाहीर केल्याने सर्व प्रसार माध्यमांचे लक्ष या टिटवी भेटीकडे लागले होते. काही दिवसांपूर्वी टिटवी येथील प्रकाश मानगावकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. यावेळी या शेतकऱ्याने सागाच्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. सागाच्या पानावर लिहिलेला हा मजकूर प्रकाशित झाला होता. यामुळे खासदार पटोले तेथे जाऊन काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु खासदार पटोले यांनी कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा केली नाही एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकारवर टीकाही केली नाही.यावरुन त्यांच्यावर पक्षाचा राजकीय दबाव होता हे स्पष्ट झाले असले तरी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...