Wednesday, 27 September 2017

अदानी फाउंडेशनतर्फे आदिवासी युवकांना रोजगाराची संधी

27 Sept 12
गोंदिया,दि.२७– अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या समूहाच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उपक्रम सध्या सुरू असून या माध्यमातून बेरोजगार युवक सद्यस्थितीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये कामाला लागले आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलप्रभावित क्षेत्रातील युवकांच्या जीवनात नवचैतन्य आणण्याचे कार्य सध्या अदानी समूहातर्फे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अदानी समूहाचे व्यवस्थापक चैतन्य साहू व कार्पोेरेट व्यवस्थापक नितीन शिरवाडकर हे याकडे लक्ष देऊन आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे अदानी समूहातर्फे वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या समूहाच्या व्यवस्थापनाकडून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. याच उपक्रमाच्या श्रृंखलेत आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील आणि विशेषतः नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवक हे बेरोजगारीच्या समस्येने ग्रासले आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे, यावर भर देण्याविषयी अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या साठी ७० आदिवासी युवकांची निवड करून त्यांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये वीजतंत्री आणि सांधाता (वेल्डर) हे दोन प्रशिक्षण निवडण्यात आले. यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ७० युवकांना उत्तम प्रशिक्षण देऊन केवळ १५ दिवसात अत्यंत कुशल असे कारागीर तयार केले जातात. यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची युवक निवडीसाठी मदत घेतली जाते. यापूर्वी सुद्धा ६०-६० आदिवासी युवकांच्या दोन तुकड्यांतील युवकांना प्रशिक्षित करून त्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यात अदानी फाउंडेशनने महत्वाची भूमिका पार बजावली आहे. येथे प्रशिक्षणाला येणाऱ्या आदिवासी युवकांना जेवण व राहण्याची सोय विनामूल्य केली जाते. या युवकांसाठी दिल्या जाणाèया सोयींचा दर्जा हा अत्यंत उच्च आहे. येथे येणाèया प्रत्येक युवकाला बोलण्या-वागण्याच्या पद्धती सुद्धा शिकविल्या जातात. त्यामुळे कोणत्याही युवकाला पुढे नोकरीसाठी मुलाखत देताना या प्रशिक्षणाचा लाभ होतो. अनेक युवकांना येथे येण्यापूर्वी साधे संभाषण सुद्धा करता येत नव्हते. मात्र, येथे आल्यावर असे युवक बिनधास्त झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
बाहेरील अन्य कंपन्या सुद्धा येथे प्रशिक्षित युवकांची मागणी करू लागल्या आहेत. अशा कपन्यांचे अधिकारी अदानी परिसरातच युवकाच्या मुलाखती घेऊन जॉब प्लेसमेंट सुद्धा देत असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. याविषयीचा किस्सा वर्णन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका कंपनीने केवळ १२ उमेदवाराची मागणी केली असता त्यांचेकडे २० प्रशिक्षित युवक पाठविल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा अदानी फाउंडेशनच्या वतीने त्या कंपनी व्यवस्थापनाला त्या युवकांशी केवळ संवाद साधण्याची विनंती केली. त्याचा परिणाम असा झाला की त्या २० युवकांना त्या कंपनीने कामावर ठेवून घेतले. यावरून अदानी फाउंडेशन देत असलेल्या प्रशिक्षणाचा दर्जा लक्षात येतो.
या प्रशिक्षणाला येणाऱ्या आदिवासी युवकांच्या जेवणाची व नाश्त्याची जबाबदारी ही सुरुची स्वयंसहायता महिला बचत गटावर सोपविण्यात आली आहे. या बचतगटामध्ये ११ महिला सदस्यांचा समावेश आहे. यासाठी अदानी फाउंडेशनच्या वतीने त्या गटाला लागणारा भांडी आणि साहित्याचा पुरवठा केला आहे. युवकांना लागणारे भोजन, नास्ता आणि चहा-काफी तयार करण्यासाठी लागणारा खर्च हा गटाला करावा लागत आहे. मोबदला म्हणून एकवेळच्या जेवणासाठी प्रती युवक ५० रुपये गटाला अदा करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
अदानी समूहाच्या वतीने आदिवासी युवकांसाठी चालविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक आदिवासी युवकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...