Tuesday, 12 September 2017

आता महामार्गावरही मिळणार मद्य

ठाणे,12- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री बंद झाली होती. देशातील अन्य राज्यांसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ही मद्यबंदी सरकारने उठवली होती. मात्र, ठाण्यासह अन्य काही शहरांमध्ये निर्बंध मात्र कायम होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही बंदी उठविण्यात आली असून महामार्गावरील वाइन, बीअर शॉप, हॉटेल तसेच परमिट रूममधील मद्यपीचे प्याले एकमेकांना भिडू लागले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यामधील पालिका हद्दीतील ६५०हून अधिक परवान्यांपैकी आतापर्यंत ४९७ मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य विरूद्ध के. बालू व अन्य याचिकांमध्ये १५ डिसेंबर २०१६ व ३१ मार्च २०१७ रोजी दिलेल्या आदेशान्वये राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी २२० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांचे परवाने देणे व नूतनीकरण बंद केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही या हद्दीतील मद्य परवान्यांचे नूतनीकरण थांबवून तिथे मद्यविक्रीसही बंदी घालण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महापालिका हद्दीतून जाणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील परवानाधारकांसाठी नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर परवान्यांचे नूतनीकरण सुरू झाले आहे. पाच महिने या परिसरातील मद्यविक्री बंद असल्याने बारमालकांचे धाबे दणाणले होते. ठाण्यातील बहुसंख्य मॉल हे महामार्गानजिक असून तिथे अनेक नामांकीत रेस्टॉरण्ट आणि बार होते. त्या सर्वांवर संक्रांत आली होती. एकेकाळी गर्दीने ओसंडून वाहणारे या भागातील बार आणि लाऊंज अक्षरशः ओस पडले होते. मात्र, परवान्यांचे नूतनीकरण झाल्यानंतर तिथे पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...