Wednesday, 20 September 2017

सरकार शेतकऱ्यांचे खिशे कापत आहे- नाना पटोले


कागदपत्रांवर जीएसटी लादून सरकार शेतकऱ्यांची लूट करत आहे -खासदार पटोलेंचा घरचा आहेर

नागपूर,20-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना थेट सवाल करून चर्चेत येणारे भंडारा-गोंदियाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारवर धारेवर धरत पक्षाला  पुन्हा घरचा आहेर दिला. सेतू केंद्रांवर मिळणाऱ्या आवश्यक कागदपत्रांवर जीएसटी लादून राज्य सरकार शेतकऱ्यांचे खिशे कापत असल्याची कडवट टीका खासदार नाना पटोले यांनी केली आहे.
खासदार नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांवर संतापतात, शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचारल्यावर केवळ योजनांची माहिती देऊन बोळवण करतात, असे विधान करून त्यांनी वातावरण चांगलेच तापवले होते.
 विदर्भातील नेते मुंबईत जाऊन विदर्भाला विसरतात, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अप्रत्यक्ष लक्ष्य केले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी नागपुरातील सिमेंट रस्त्यांना तडे गेल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता खासदार नाना पटोले यांनी राज्य सरकारचा फुटबॉलचा उपक्रम आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
फुटबॉल खेळणे चांगले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, असे जाहीर वक्तव्य खासदार नाना पटोले यांनी नागपुरात केले. सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आवश्यक कागदपत्रांवर राज्य सरकार जीएसटी लादून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा त्यांनी नवा बॉंब सरकारवर टाकला आहे. या कागदपत्रांवर जीएसटी आकारणे सरकारने बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पेट्रोलच्या दरांवरही त्यांचा आक्षेप आहे. दर आणखी कमी होणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...