Thursday, 21 September 2017

मीच पक्ष सोडतो, असे म्हणत नारायण राणेंची अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी


 

rane03_1505991346
सिंधूदुर्ग(विशेष प्रतिनिधी),दि.21- ‘तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो’, असे म्हणत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज (गुरुवारी) घटस्थापनेच्या मुहुर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सोबतच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.
अलीकडच्या काळात नारायण राणे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आपली पुढील राजकीय वाटचाल लवकरच निश्चित करू, असे त्यांनी स्पष्ट केले.संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दसर्‍याच्या आधी माझी ताकद काय आहे, हेही दाखवून देतो. दसर्‍याच्या आधी पुढील भूमिका स्पष्‍ट करणार असल्याचे राणेंनी म्हटले आहे. शिवसेनेचे 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी राणेंनी काँग्रेसमधील 12 वर्षांची खदखद व्यक्त केली.

मुख्यमंत्रिपदाबाबत चाचपणी करण्यासाठी त्यावेळी प्रणव मुखर्जी, अँटनी आणि दिग्विजयसिंह हे निरीक्षक म्हणून आले होते. तेव्हा 48 आमदारांनी मला पसंती दिली, तर 32 आमदारांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली होती. तरीही मला संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनाच पक्ष वाढवायचा नाही. तेच पक्षातील नेत्यांवर कुरघोड्या करत आहेत. त्यामुळे मला चारवेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. पक्षात आल्यानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने मला दिले होते, मात्र ते पाळले नाही, असे त्यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांनी मला केवळ अडचणीत आणण्याचे काम केले असे राणेंनी सांगितले. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दुकान बंद होणार असून महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही, अशी राणेंनी नाराजी यावेळी व्यक्त केली आहे. आता मी काँग्रेसमूक्त झालो असल्याचे ते म्हणाले. दुपारी दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवले आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवल्याचे राणेंनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...