Sunday 17 September 2017

बिनधास्त बोलणे अंगलट आले- एकनाथ खडसे


पुणे,17- ‘विरोधकांचे सरकार असताना मी त्यांच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडले. त्यावेळी माझ्यावर कोणतेही आरोप झाले नाही. आमचे सरकार येताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. पण त्या सर्व फुसक्या ठरल्या. आता नवीन आरोपांच्या पिल्लूंची प्रतिक्षा करतोय,’ अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षातील हितशत्रूंना घरचा आहेर दिला. त्यावेळी त्यांनी ‘बिनधास्त बोलणे अंगलट आले,’अशी कबुली दिली.
ते पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना आयोजकांतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे (संयुक्त) मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता के. सी. त्यागी हे होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकरराव जाधव, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दूल जाधवर उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन. सी. जोशी, संतोष कुलकर्णी, सुरेश चव्हाण यांना आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी पुढे बोलताना खडसे म्हणाले की,‘चाळीस वर्षे मी राजकारणात आहे. आतापर्यंत कोणत्याही विरोधकांनी माझ्यावर आरोप केले नाहीत. अनेकवेळा सभागृह दणाणून सोडले आहे. पण सरकार आले आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. आतापर्यंत ८० प्रकारचे आरोप झाले. माझी बायको दाऊदशी बोलल्याचा आरोप झाला. सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक, प्राप्तीकर विभाग आणि पोलिसांच्या चौकशा झाल्या. त्या चौकशीतून काही आढळले नाही. आता नव्या आरोपांची वाट पाहतोय,’ अशा शब्दांत पक्षातील विरोधकांना एकनाथ खडसे यांनी टोला लगावला. राजकीय जीवनात विविध पदे, मंत्रिपदे, विविध खाती सांभाळली. पैसे कमवायचे असते तर एखादे मेडिकल कॉलेज काढले असते. कोणाला किती आरोप करायचे ते करू द्या. आपण आपले प्रामाणिकपणे काम करायचे,’ असेही ते म्हणाले. ‘जीवनगौरव पुरस्कार मिळाला म्हणजे करिअर संपले नाही. ही तर आपल्या कामाची खरी पोचपावती आहे. आता नव्याने सुरुवात झाली आहे,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘पूर्वी बिनधास्त बोलले तरी अडचण नव्हती. आता बिनधास्त बोलताना काळजी घ्यावी लागते. त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजप सरकार सत्तेत आले. आजच्या भाजपाची ओळख ही त्यांची पुण्याई आहे. आज मुंडे असते तर राज्याच्या राजकारणाची दिशी बदलली असती,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...