Wednesday 20 September 2017

कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 22 सप्टेंबर पर्यंत

मुंबई,20-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बँकांनीसुद्धा वेळेत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाला द्यावी, अशा सूचना पुन्हा नव्याने संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ५६ लाख सात हजार ८८३ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व बँकांनी कर्जमाफीसाठी लागणारी सर्व माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाला वेळेत उपलब्ध करून द्यावी. तसेच बँकांकडून संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने तपासणी करावी. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे या बैठकीत ठरले.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...