Thursday 14 September 2017

जिल्ह्याला ३१ लाख ६४ हजाराचे उद्दिष्ट- अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.१४ : जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सन २०१९ पर्यंत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्याला सन २०१७-१८ वर्षात ३१ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यावर्षी वृक्ष लागवड करतांना केवळ एकाच प्रजातीची रोपे ५ टक्क्यापेक्षा जास्त नसावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
१३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सन २०१७-१८ या वर्षात लावण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या निमित्ताने आयोजित बैठकीत श्री.काळे बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, वन विकास महामंडळाचे विभागीय वन अधिकारी पी.जी.नौकरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.पी.व्ही.रुखमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, जिल्ह्यात कार्यरत केंद्र शासनाच्या विविध विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात यावे. त्यानुसार त्यांनी लागवड करावी. यावर्षी नवीन वृक्ष लागवडीत एकाच वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करु नये. याची दक्षता घ्यावी. नवीन तीन रोपवाटिकेत दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या स्वदेशी वृक्षांची रोपे तयार करावी. वन्यप्राणी पक्षी खातील अशा फळझाडांची रोपे लावावी. असे ते म्हणाले.
यावर्षी लागवड करण्यात येणाऱ्या स्वदेशी वृक्षांची यादी तयार करण्यात यावी असे सांगून श्री.काळे म्हणाले, दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करतांना फळांची रोपे लावावी. तृणभक्षी प्राण्यांच्या आवडीच्या वृक्षांची लागवड करावी. कोणती रोपे रोपवाटिकेत लावणार यासाठी कोणत्या साधन सामुग्रीची आवश्यकता लागणार आहे याचे नियोजन आतापासूनच करावे. इतर यंत्रणांनी ७५ टक्के फळवर्गीय रोपट्याची लागवड करावी तसेच बांबू लागवड सुध्दा करावी. असे त्यांनी सांगितले.
श्री.युवराज म्हणाले, कृषि विभागाने शेतकऱ्यांच्या मोकळ्या/पडीक व शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा, कर्मचारी वसाहती, विश्रामगृहांच्या परिसरात तर सहकार विभागाने सहकारी संस्था, सहकारी बँका व बाजार समित्यांच्या परिसरात वृक्ष लागवडीचे नियोजन करावे असे सांगून ते म्हणाले, विविध विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळ आणि ग्रामपंचायतींना वेगळे उद्दिष्ट दिले आहे. कृषि विभाग- १७३७५०, नगर विकास विभाग- ६९५००, सार्वजनिक बांधकाम विभाग- ६९५००, जलसंपदा- ६९५००, सहकार व पणन- ३४७५०, उद्योग- ३४७५०, शालेय शिक्षण विभाग- ३४७५०, उच्च व तंत्रशिक्षण विभाग- १७३७५, गृह विभाग- १३९००, आदिवासी विकास विभाग- १७३७५, समाज कल्याण विभाग- १७३७५, आरोग्य विभाग- ६९५०, वीज वितरण कंपनी- ६९५०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- ६९५०, परिवहन- ३४७५, यासह राज्य व केंद्र शासनाच्या ३४ विभागाला जिल्ह्यासाठी ३१ लक्ष ६४ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सभेला जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...