Thursday 14 September 2017

'इनकी तो मैं.....' म्हणत लेखा परीक्षकाने ग्रामसेवकांना कार्यालयाबाहेर हाकलले



लेखा परीक्षक राजेश शहारे यांची ग्रामसेवकांना असभ्य वागणूकीसह दमदाटी
ग्रामसेवक संघटनेची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार

गोंदिया,१३- गोंदिया जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामाचे लेखापरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने खासगी लेखा परीक्षक राजेश शहारे यांची नियुक्ती केली. सदर लेखा परीक्षकाकडे ग्रामसेवक व रोजगारसेवक आपले दफ्तर परीक्षणासाठी घेऊन गेले असता आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्याने ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांना अश्लील शिवीगाळ करून अपमानित केले. 'गटविकास अधिकारी मेरा बाप नही है', 'मै सरकारी कर्मचारी नही हू', 'इनकी तो मैं.... फोडता हू', असे म्हणून शासकीय रेकॉर्ड सुमारे दोन तास आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेने केला आहे. या उद्धट लेखापरीक्षकावर फौजदारी कार्यवाहीसह त्याची नियुक्ती रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली. कार्यवाही करण्यास टाळाटाळ करण्यात आली तर याविरुद्ध राज्यस्तरावर आंदोलन करून मग्रारोहयोच्या कामास ग्रामसेवक संवर्ग सहकार्य करणार नसल्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी गोंदिया यांना एका निवेदनातून दिला आहे.
सविस्तर असे की, गोंदिया जिल्ह्यातील सन २०१६-१७ या काळात मग्रारोहयोच्या झालेल्या कामाचे लेखा परीक्षण करण्यासाठी जिल्ह्याधिकारी कार्यालयाने लेखापरीक्षक म्हणून सीए राजेश शहारे यांची नियुक्ती केली. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी आपल्या कार्यालयातील संबंधित संपूर्ण रेकॉर्ड शहारे यांचेकडे घेऊन गेले. दरम्यान, गेल्या सोमवारी (ता.११) शहारे यांनी काही कर्मचाऱ्यांकडे अवास्तव मागणी केल्याचे समजते. यावरून ग्रामसेवक आणि शहारे यांच्यात वादाची ठिणगी पडली. परिणामी, लेखापरीक्षक शहारे यांनी ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांना 'तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला अक्कल नाही' असे म्हणून बळाचा वापर करून गेट बाहेर हाकलले. यावर काही ग्रामसेवकांनी प्रकरण वाढू नये, यासाठी संबंधित लेखापरीक्षकाला गटविकास अधिकारी यांचेशी बोलण्याची विनंती केली. यावर संबंधित लेखापरीक्षकाने 'गटविकास अधिकारी मेरा बाप नही है, मै सरकारी कर्मचारी नही हू', असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली. 'इनके बाल की खाल निकालना है', असे म्हणत संबंधित ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड स्वतःच्या ताब्यात घेतले. या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणाची माहिती ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना देत या लेखापरीक्षकाची नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासह शासकीय दस्तावेज बळजबरीने ताब्यात घेणे, शासकीय कर्मचाèयांना दमदाटी करणे, पैशाची मागणी करणे, अपमानास्पद वागणूक देत अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ करणे या आरोपाखाली त्याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि भविष्यात लेखापरीक्षण हे खासगी कार्यालयात न करता शासकीय कार्यालयातच करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवदेन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या लेखा परीक्षकावर कार्यवाही करण्यात आली नाही तर राज्यस्तरावर या विषयी आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कमलेश बिसेन, उपाध्यक्ष वनिता कांबळे, पी. जी. ठाकरे, लक्ष्मण रा. ठाकरे, कार्तिक चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...