Wednesday 20 September 2017

नवीन राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकाची गरज


20gndph23_20170913957
हाच तो प्रस्तावित महामार्ग


प्रवासी आणि वाहनचालकांसह जनतेच्या सुरक्षेला प्राथमिकता हवी

सुरेश भदाडे

गोंदिया,१९- देशातील वाहतूक व्यवस्था जलदगतीने होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील अनेक राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करून त्या मार्गाचे अपग्रेडेशन करण्याचे कार्य सुरू आहे. यामध्ये गोंदिया-देवरी-कोरची या राज्य मार्गाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर या मार्गावर वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा महामार्ग तयार करण्याच्या प्राथमिक अवस्थेत एकेरी वाहतुकीसाठी रस्ता दुभाजक तयार करण्याचा विचार करण्यात यावा. यामुळे भविष्यात होणाऱ्या नुकसानीची तीव्रता आणि अपघातांच्या संख्येत कमी होऊन संभाव्य लोकभावना उद्रेक यावर नक्कीच अंकुश लावता येईल.
वाहनांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ आणि जलद वाहतूक यासाठी केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून देशात महामार्ग निर्मितीचे काम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यातील अनेक महत्त्वाच्या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. यात गोंदिया ते देवरी या मार्गाचासुद्धा समावेश आहे. हा महामार्ग पुढे जाऊन दक्षिणेकडे जाणाऱ्या मोठ्या महामार्गाला जोडण्यात येणार आहे. परिणामी, जबलपूर कडून येणाऱ्या आणि हैदराबाद कडे जाणारी वाहतूक या मार्गावर येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत तिपट्टीने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्यःपरिस्थितीमध्ये या राज्यमार्गावरील अपघातांची संख्या लक्षणीय आहे. या परिस्थितीचा महामार्गाच्या प्राथमिक अवस्थेतच विचार केला जावा, अशी रास्त अपेक्षा आहे.
या महामार्गावर कोट्यवधीचा निधी खर्च केला जाणार असून हा महामार्ग सीमेंटक्राँकीटचा वापर करून करण्यात येणार आहे. या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करीत असताना हा मार्ग दुपदरी असल्याचे समजते. त्यामुळे वाहनांची वाढणारी संख्या आणि गाड्यांचा वेग लक्षात घेता अपघातांची संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आजारानंतर उपचारांवर होणारा खर्च आणि मनस्ताप याचा वेळीच विचार केला गेला नाही तर परिणाम आणि आर्थिक खर्चात होणारी वाढ ही निश्चितच मोठी राहणार, यात दुमत असण्याचे कारण नाही.
यासाठी महामार्ग निर्मीतीमधील मागील अनुभवांचा विचार करणे गरजेचे आहे. रायपूर- भंडारा महामार्ग तयार करतेवेळी अनेक गावातून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला होता. यामुळे गाव-शहरातून जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ही बिनदिक्कत होऊन स्थानिक वाहतूक प्रभावित होण्यापासून रोखण्याचा उद्देश होता. उड्डाणपुलामुळे अपघातांच्या संख्येत नक्कीच घट आणता आली असती. मात्र, काही व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी काही धनदांडग्यांनी विरोध दर्शविला होता. या आगीत तेल ओतण्याचे कार्य तत्कालीन विरोधक आणि आताचे सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर केले होते. याची परिणती, सरकार आणि महामार्ग निर्मिती करणाऱ्या एजंन्सीवर दबाव निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी रास्तारोको सारखी आंदोलने करण्याची भाषा वापरली गेली. त्यामुळे आपल्या डोक्याचा ताप कमी करून महामार्ग वेळेत पूर्ण करण्याचे धोरण महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराने स्वीकारले. यावेळी लोकांच्या जीवित हानीचा कोठेही विचार करण्यात आला नाही. अनेक खोटे तर्कवितर्क दिल्या दिल्या गेले. आता त्याच लोकप्रतिनिधींची भाषा बदलली आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातामुळे हेच लोकप्रतिनिधी बेगळी सहानुभूती दाखवत उड्डाणपूल व्ह्यायला पाहिजे अशी मागणी करू लागले. लाखनी, साकोली, कोहमारा आणि देवरीतील उड्डाणपूल रद्द करून त्याठिकाणी कुचकामी ठरणारे बैरिकैट्स लावण्यात आले. आज व्यापाऱ्यांनी अनेक ठिकाणी असे बैरिकैट्स तोडून महामार्गावरून आरपार जाण्याची सोय केली. यातून पादचाऱ्यांच्या होणाऱ्या अडथळ्यांमुळे वाहनचालकांचे दुर्लक्ष होत अनेक अपघात सुद्धा झाले. याशिवाय महामार्गावरील वाहतुकीच्या वेगावर सुद्धा याचे दुष्परिणाम झाले. यातून पुढे आर्थिक पेच निर्माण झाले. असे असले तरी हे महामार्ग चौपदरी असून येथे एकेरी वाहतूक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या लेन्समध्ये महामार्ग दुभाजक आहेत. त्यामुळे कोणतेही वाहने समोरासमोर येत नाही. याशिवाय रस्ता क्रॉस करण्यासाठी सुद्धा विशिष्ट जागा असल्याने कोणतेही वाहन अचानक आडवे येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे वाहनांचा वेग प्रभावित तर होत नाही शिवाय अपघात होण्याची तीव्रता कमी करता आली.
मात्र, देवरी गोंदिया दरम्यान तयार होणाऱ्या महामार्गावर कोठेही उड्डाणपूल वा रस्ता दुभाजकाची सोय असल्याचे दिसत नाही. याशिवाय या भागातील जनतेला राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा फारसा अनुभव सुद्धा नाही. त्यामुळे रस्ता दुभाजकाची गरज अधोरेखित करणे गरजेचे आहे. जर रस्ता दुभाजकाशिवाय महामार्ग तयार करण्यात आला तर निश्चितच अपघातांच्या संख्येत वाढ होऊन लोकांच्या जीवितहानीचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. असे झाले तर सरकार आणि प्रशासनावर त्याचा नाहक ताण वाढेल आणि त्याचे परिणाम जीवित व आर्थिक हानीत झाल्याशिवाय राहणार नाही. 
भविष्यात उद्भवणाऱ्या या गंभीर समस्यांचे आणि जनक्षोभाचा विचार हा महामार्ग निर्मितीच्या सुरवातालीच होणे अपेक्षित आहे. यासाठी या भागातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींवर मोठी जबाबदारी आली आहे. वेळीच उपाययोजना करण्यात आली तर अनेकांच्या प्राणाची होणारी क्षती ही रोखून नंतर होणाऱ्या नुकसानीवर अंकुश लावता येईल.



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...