Sunday, 17 September 2017

ऐन दिवाळीत एसटीने दिली प्रवाशांना भाववाढीची सप्रेम भेट




मुंबई,17- दिवाळीत एसटीने प्रवास करायचा असेल, तर प्रवाशांना खिशाला खार लागण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये १० ते २० टक्के दरवाढ होणार आहे. १४ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये परगावी जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे अनेकजण महिनाभर आधीच आरक्षण करून ठेवतात. त्यामुळे सध्या तिकीट केंद्रांवर वाढीव भाडे आकारणीला सुरुवात झाली आहे. हंगामानुसार एसटीच्या भाड्यात ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा किंवा भाडे कमी करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला राज्य परिवहन निगमने दिला आहे. त्यामुळे यंदाही दिवाळीसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
साधी बस व रातराणी बससाठी १० टक्के, निमआराम बस सेवांसाठी १५ टक्के आणि वातानुकूलित बससाठी २० टक्के भाडेवाढ आहे. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाला चांगल्या प्रमाणात महसूल मिळतो. गेल्या वर्षी दिवाळीत अशाच प्रकारे भाडेवाढ केल्याने महामंडळाला ३६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याआधीच्या वर्षी ४२ कोटी रुपये महसूल एसटीला मिळाला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...