नवी दिल्ली, दि. 16 - मोटार सायकल वा कार चालविणारे हे धनदांडगे आहेत. पेट्रोलचे दर वाढविले तर ते मरणार नाहीत. कार- बाईक्स चालवायच्या असतील तर पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स हा त्यांना भरावाच लागेल, असे वादग्रस्त विधान दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द केंद्रीय मंत्री के.जे. अल्फोन्स यांनी केले आहे.
'सरकार गरिबांचं कल्याण करण्याच्या हेतूने काम करत आहे. प्रत्येक गावात वीज देण्यासाठी, लोकांसाठी घरनिर्माण करण्यासाठी, शौचालय बांधून देण्यासाठी सरकार आले आहे', असे के जे अल्फोन्स यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'गरिबांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे, त्यासाठी आम्ही कर चुकवण्यासाठी सक्षम असणा-यांवर कर लावत आहोत'.
'तुम्ही सांगा पेट्रोल कोण खरेदी करतं ? तेच लोक ज्यांच्याकडे कार आहे, बाईक आहे. निश्चितपणे हे लोक भुकेने मरत नाहीत आहेत. ज्यांना कर चुकवणे शक्य आहे त्यांनी कर चुकवलाच पाहिजे', असं के जे अल्फोन्स बोलले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गेल्या ३ वर्षांत ५0 टक्क्यांनी कमी झाले असताना, भारतात मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या किमतींनी मंगळवारी उच्चांक गाठला. दिल्लीमध्ये पेट्रोल 70 रुपये 38 पैसे तर डिझेल 58 रुपये 72 पैशांच्या दराने विकलं जात होतं. तर मुंबईत पेट्रोलचा दर 79 रुपये 48 पैसे आणि डिझेलचा दर 62 रुपये 37 पैसे होता. चेन्नई व कोलकत्यातही भाव असेच चढे आहेत. या दरवाढीवर सर्वत्र टीका सुरू होताच, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी लगेच संबंधितांची बैठक बोलावली, पण त्यातून दरवाढ कमी करण्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.
No comments:
Post a Comment