चिचगडचे ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर ; डॉक्टरांच्या चारही जागा रिक्त
चिचगड,१३ (सुभाष सोनवाने) - केंद्र सरकारसह राज्यातील देवेंद्र फडणवीसांचे सरकार विकासाच्या कितीही गप्पा मारत असले तरी राज्याच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम, मागास, आणि नक्षल्यांच्या सावटाखाली जीवन जगणाèया आदिवासींना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकार झटकत असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आदिवासींच्या नावावर सरकार कोट्यवधीचा निधी खर्च करीत असल्याचा गवगवा करीत असला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा आदिवासींपर्यंत पोचत नसून मलई फक्त राजकारणी, नोकरदार हेच लाटत असल्याचा आरोप आज आदिवासी समाजातून होत आहे.
जंगलव्याप्त आणि नक्षल भागात राहणाऱ्या व दळणवळणाच्या फारशा सोयी नसलेल्या चिचगड येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचेसह कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा वेळोवेळी विनंती करूनही सरकार भरत नाही. तर दुसरीकडे, वैद्यकीय उपकरणे व औषधसाठा सुद्धा वेळेवर उपलब्ध करून देत नसल्याने आदिवासींना सरकारने मरण्यासाठी वाऱ्यावर सोडले काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसह स्थानिक खासदार व आमदार यांना जनतेने विचारला आहे. उल्लेखनीय म्हणजे लोकसभा निर्वाचन क्षेत्र व विधानसभा निर्वाचन क्षेत्र हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, हे येथे विशेष.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड हा परिसर अत्यंत मागास, अतिदुर्गम, नक्षलप्रभावीत आणि दळणवळणाच्या फारशा सोयी नसलेला आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील आदिवासी जनतेच्या आरोग्याच्या जबाबदारी ही एकमेव ग्रामीण रुग्णालयावर आहे. या रुग्णालयाच्या अखत्यारित सुमारे ४० किलोमीटर कक्षेतील गावे येतात. हा भाग आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असल्याने या भागातील ग्रामीण लोकांचे आरोग्य हे फक्त शासकीय सेवेवर अवलंबून आहे. चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चारही जागा या पूर्ण रिक्त आहेत. एकूण सात परिचारिकांपैकी ४ जागा सुद्धा रिक्त आहेत. याशिवाय परिचर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,क्ष-किरण तंत्रज्ञ आणि सफाईकामगारांच्या जागा रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे क्ष-किरण यंत्रासह अनेक वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त असून याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाने वाऱ्यावर सोडलेल्या या रुग्णालयसंदर्भात वारंवार उठणारी आरोळी शमविण्यासाठी देवरी येथील एका वैद्यकीय अधिकाèयाची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे वैद्यकीय अधिकारी महोदय सुद्धा वेळेवर हजर राहत नाही. आठवड्यातील चार दिवस तर ते औषधालाही सापडत नाही. त्यामुळे येथे येणारा रुग्ण गावातील वैदूकडे वा झोलाछाप डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो. क्रिटिकल अवस्थेत असणाèया रुग्णाला इतरत्र वा देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात रेफर केले जाते. या रुग्णालयात होणाèया शस्त्रक्रिया सुद्धा डॉक्टरांअभावी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. आधीच गरिबीत जीवन जगणाèया आदिवासी जनतेला पैशाअभावी बाहेर उपचार घेणे शक्य नाही. घरून जेवणाचे डबे घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक अचानक त्यांचा रुग्ण बाहेर रेफर केल्यामुळे रडकुंडीस येत असल्याचे प्रकार येथे नेहमीचेच झाले आहे.
गरीब आदिवासींच्या विकासाच्या थापा मारणारे सरकार व त्यांचे लोकप्रतिनिधी आदिवासींना वैद्यकीय सेवा देण्यासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. परिसरातील काही खासगी डॉक्टरांचे हित संबंध व मर्जी राखण्यासाठी लोकप्रतिनिधी रिक्त जागा भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने एखादा डॉक्टर आलाच व त्याने रुग्णांना उत्तम सेवा देणे सुरू केले तर अशा डॉक्टरांना राजकारणाचा वापर करून हुसकावून लावण्याचे प्रकार यापूर्वी येथे झाले असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. मायबाप सरकारने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन चिचगड येथील आजारी ग्रामीण रुग्णालयाचा उपचार करून आदिवासी ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची तसदी घ्यावी, अशी विनंती या भागातील नागरिकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment