यवतमाळ, दि. 22 :: नागपूर व यवतमाळ पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका कुख्यात गुंडाने पोलिसांवर चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. 21) रात्री शहरात घडली. यात तीन पोलिस कर्मचार्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
येथील रहिवासी नारू पिल्ले यांचा नागपुरात राहणारा भाचा प्रतीक पिल्ले (वय 23) हा गुरुवारी शहरातील आठवडी बाजारात चाकूचा धाक दाखवून लोकांना धमकावत होता. त्यामुळे आठवडी बाजारातील काही नागरिकांनी त्याला तेथून हाकलून लावले. त्यानंतर तो अग्रसेन भवनजवळ असलेल्या दुर्गादेवीच्या मंडपाजवळ आला. तेथेही त्याने रंगदारी सुरू केली. चाकूचा धाक दाखवून लोकांना धमकावले. त्यामुळे दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्याचा वाद झाला. कुणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक संजीव खंडारे, जमादार सुजित सोनोने, जमादार सुहास मंदावार, पोलिस कर्मचारी नितीन गेडाम व सचिन मडकाम तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याचे पाहताच त्या गुंडाने तेथून पळ काढला. तो आपल्या मामाच्या घरी दडून बसला. पोलिसांना त्याच्या मामा नारू पिल्ले यांनी तो घरी नसल्याचे सांगितले.
पोलिस परत फिरताना बोळीत लपून बसलेल्या त्या गुंडाने पोलिसांवर चाकूहल्ला केला. त्याने पोलिस उपनिरीक्षक संजीव खंडारे यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. तर जमादार सुजित सोनोने यांच्या पाठीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर सुहास मंदावार यांच्या खांद्यावर चाकू मारला. तो चाकू त्याच्या खांद्यातच तुटला. त्यामुळे त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकू बाहेर काढला. यात तिन्ही पोलिस कर्मचार्यांना गंभीर दुखापत झाली. तर झटापटीत संशयित आरोपी प्रतीक पिल्ले यालाही खाली पडल्याने डोक्याला मार लागला. त्या सर्वांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment