नवी दिल्ली,13-खानपान आणि पेहराव याच्याशी हिंदुत्वाचा काडीमात्र संबंध नाही. दुसऱ्या व्यक्तीला आहे त्या स्वरूपात स्वीकारणं हे हिंदुत्व आहे,' असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे. असहिष्णुता व संस्कृती रक्षणावरून देशात सध्या सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
भाजपचे सरचिटणीस राम माधव यांच्या 'इंडिया फाउंडेशन'नं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जगातील सुमारे ५० देशांचे राजदूत व राजकीय तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सध्याच्या राजकीय आणि सोशल मीडियावरील वादावर भागवत यांनी यावेळी परखड भाष्य केलं. सोशल मीडियातून होणाऱ्या ट्रोलिंग या प्रकारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे. सोशल मीडियात सध्या काहीजण अतिशय आक्रमकपणे व्यक्त होतात. याशिवाय ट्रोलिंगचे प्रकारही वाढत आहेत. संघ अशा आक्रमक लोकांच्या पाठीशी नाही. ट्रोलिंगचे हे प्रकार म्हणजे कंबरेखाली वार करण्यासारखे आहे, असं भागवत म्हणाले.
भाजप आणि संघ या दोन संघटना पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. संघ भाजपच्या मागे पळणारी संघटना नाही किंवा भाजप संघाच्या मागे पळणारी संघटना नाही. दोन्ही वेगवेगळ्या आहेत. परंतु कधी-कधी भाजप आणि संघाचा अजेंडा एकसारखाच असतो. तो नैसर्गिक आहे, बनवलेला नाही, असंही डॉ. भागवत यांनी यावेळी सांगितले. संघाच्या स्वयंसेवकाला कुठेही काम करण्याची मुभा आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षात काम करू शकतात, असंही भागवत म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भेदभावही मानत नाही. या देशाची व जगाची अखंडता हे संघाचं उद्दिष्ट आहे असे सांगत आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांत संघातर्फे देशभरात तब्बल पावणेदोन लाख प्रकल्प सुरू आहेत. आपण या प्रकल्पांना भेट देऊन त्यांचा आढावा घ्यावा, असं आवाहन भागवत यांनी या प्रतिनिधींना केले
No comments:
Post a Comment