Wednesday, 13 September 2017

लाच मागणा-या पोलीस उपनिरीक्षकासह शिपायाला अटक


चंद्रपूर,दि.12- पोलीस कोठडीत वाढ न करण्याकरीता लाच मागणा-या पोलिस उपनिरिक्षकासह शिपायाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ माजली आहे. दारुच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीचा पीसीआर न वाढविण्यासाठी सदर आरोपीच्या भावाला लाच मागणा-या पोलिस उपनिरिक्षकासह पोलिस शिपायाला नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
सदर कारवाई नंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून केशव गोविदराव पुंजरवाड वय ३६, असे आरोपी पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. तर धीरजकुमार रामराव लोधी वय ३२, असे अटकेत असलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. हे दोघेही रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. नागालँड राज्यातील दारुचा ट्रक पोलीस उपविभागीय अधिका-याच्या पथकाने रामनगर हद्दीत पकडला होता. या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी मोनु शर्मा या आरोपीला रामनगर पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर सदर आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. मात्र, पोलीस कोठडीत आणखी वाढ न करण्याकरीता आरोपीच्या भावाला रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरिक्षक केशव गोविंदराव पुंजरवाड व पोलिस शिपाई धीरजकुमार लोधी यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने आरोपीच्या भावाने याबाबत तक्रार नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. या संदर्भात सापळा रचून नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी  दोन्ही आरोंपीना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...