नागपूर,दि.11- 2011 साली देशभर गाजलेल्या कुश कटारिया खून खटल्यातील मुख्य दोषी आयुश पुगलिया (28) याची नागपूरच्या तुरुंगात हत्या झाल्याचे समोर आले आहे. आयुश पुगलियाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 11 ऑक्टोबर 2011 रोजी खंडणीसाठी कुश कटारिया या बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. यानंतर त्याच्या दुस-या दिवषी कुशचा मृतदेह कळमना ठाण्याच्या हद्दीतील एका नवनिर्माण इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला होता. या प्रकरणी आयुष पुगलिया याच्यासह त्याचे भाऊ नितीन आणि नवीन हे दोषी आढळले होते. या प्रकरणात तो सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत होता. तेथेच आज सकाळी निर्घूण हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आयुश प्रातर्विधीसाठी टॉयलेटजवळ गेला होता. त्याचवेळी एका कैद्याने आयुशला गाठले आणि त्याच्या डोक्यात जोराने फरशी हाणली. हा फटका थेट आयुशच्या डोक्यावर लागल्याने तो जागेवरच कोसळला. त्याला नंतर रूग्णालयात दाखल केले मात्र अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, जेल प्रशासनाने धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आयुशची हत्या करणा-याला अटक केली आहे. हत्या केलेल्या कैद्याची माहिती मिळू शकले नाही तसेच त्याने त्याची हत्या का केली याचेही कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment