गडचिरोली ,दि.15(विशेष प्रतिनिधी)- देशातील शेतकºयाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकºयांचा हक्क हिरावून घेतला आहे.शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, अशी अवस्था आहे. परंतु कर्जमाफीनंतर सरकार चावडीवाचन करुन कर्ज असलेल्या शेतकऱ्याच्या अब्रूचा पंचनामा करीत आहे. त्यामुळे गावभर बदनामी होण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, असा विचार त्याच्या मनात येत आहे. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने आत्महत्या होत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली.आज १५ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉनमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गडचिरोलीच्यावतीने शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, युवक, विद्यार्थी, महिला, व्यापारी, बेरोजगारांच्या वाचा फोडण्याकरीता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरदचंद्र पवार बोलत होते.
माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, गुलाबराव गावंडे, आ.संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, ऋतुराज हलगेकर उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी अर्थनीती, करपद्धती कशी असावी, याचं विवेचन केलं आहे. वीजनीती, वीजमंडळ कसं असावं, धरणं कशी असावी, याबाबतही त्यांनी उत्कृष्ठपणे विचार मांडले आणि भाक्रानांगल धरणाची निर्मिती बाबासाहेबांच्याच विचारधारेतून झाली. मात्र, सध्याच्या सरकारला बाबासाहेबांच्या अर्थनीतीचा विसर पडला आहे. व्यापाऱ्यांना मंदीचा फटका बसत आहेत. व्यापारी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. त्यात नोटाबंदी आणि जीएसटीची भर पडली आहे. २८ टक्क्यांपर्यंत करवाढ करण्यात आली आहे. एवढा कर लावायचा असतो काय, असा सवाल शरद पवार यांनी केला. एवढा कर लावल्यास व्यापाऱ्यांमध्ये करचुकवेगिरीची भावना येऊ शकते. उद्योगांना खीळ बसली आहे. मग, देशाची संपत्ती वाढणार कशी? अलिकडे शिक्षणाचं प्रमाण वाढत असल्याचा आनंद आहे. पण सुशिक्षित युवक, युवतींच्या हाताला काम कुठे आहे? ३ वर्षांत जेवढी बेकारी वाढली, तेवढी ती यापूर्वी कधीच वाढली नव्हती. राज्यकर्त्यांनी ही संकटं गांभीर्याने घ्यावीत, असे पवार म्हणाले.
सुरुवातीला धर्मरावबाबा आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांचा भव्य पुष्पहार घालून तसेच आदिवासींची बांबूची टोपी व तिरकमठा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम व रवींद्र वासेकर यांचीही भाषणे झाली. ऋषिकेश पापडकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
No comments:
Post a Comment