गोंदिया/नागपूर,दि.06 – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवाला हाताशी धरुन मागासवर्गीय अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे नुकसान स्वतःच्या स्वार्थासाठी करुन स्वतःच्या मुलीला मिळवून दिलेली परदेश शिष्यवृत्ती ही भाजप सरकारच्या गैरकारभाराचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वड्डेटीवार यांनी बेरार टाईम्सकडे व्यक्त केली.सोबतच त्यांनी सामाजिक न्यायमंत्र्यांनी पदाच्या गैरवापरप्रकरणी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली असून बडोलेंचा राजीनामा घेणे हे खर्या अर्थाने भाजपच्या धर्म संस्कृतीचे रक्षण केल्यासारखे होईल असेही म्हटले आहे.
आमदार वड्डेटीवार म्हणाले की राजुकमार बडोले हे गेल्या 8 वर्षापासून आमदार असून तीन वर्षापासून मंत्री आहेत.त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करीत सचिवाला हाताशी धरुन आपल्या पाल्यांना परदेश शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मूळ शासन निर्णय बदलविले आहे.सचिव व मंत्र्यासह अधिकारी यांच्या पाल्यांना मिळालेल्या परदेश शिष्यवृत्तीमूळे अनुसूचित जातीतील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांंचे मात्र नुकसान झाले आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले असतांना त्यांनी स्वतःचा फक्त स्वार्थ बघितला असून त्यांची भूमिका ही सर्वसमावेशक नसल्याचे यावरुन स्पष्ट झाल्याचे प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.
एकीकडे पात्र विद्यार्थी असतांना त्यांची निवड न करात स्वतःच्या स्वार्थासाठी मूळ शासन निर्णय बदलवून आर्थिक निकषात बदल करणे यापेक्षा स्वार्थ असू शकत नाही.सचिव व मंत्री यांनी मिळून अनुसूचित जातीच्या लोकांचा विश्वासघातच नव्हे तर अपमान केला आहे.त्यापलीकडे जाऊन आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करु शकतो याची प्रचिती दिल्याचे वड्डेटीवार म्हणाले.राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तराला जाऊन शासन निर्णयात बदल करु शकते आणि निर्णय बदलवू शकते हे या प्रकरणावरुन सिध्द झाल्याचे म्हटले आहे.सोबतच हे सरकार गरीबांचे,मागासवर्गियांचे नसून पोटभरलेल्या माणसांच आहे.हे उपाशी माणसांचे नव्हे तर पोट भरलेल्या माणसासांठीचे सरकार असल्याचे दाखवून दिल्याचे म्हणाले.बडोले व त्यांच्या सचिवांनी केलेल्या प्रकाराचा आम्ही निषेध नोंदवित असून त्यांची मंत्रीमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीही केली आहे.
आमदार वड्डेटीवार म्हणाले की,वैद्यकीय प्रवेशात आपल्या मुलीला प्रवेश मिळावा यासाठी दोन गुण वाढविल्यामुळे तत्कालीन मंत्री बाबासाहेब भोसले यांना राजीनामा द्यावा लागला होता.आत्ता तर बडोले यांनी व सचिवांनी आपल्या पाल्यासांठी शासन निर्णयच बदलविला आहे,त्यामुळे त्यांचा राजीनामा स्विकारणे हे खर्या अर्थांने भाजप संस्कृतीचे धर्म रक्षण केल्यासारखे होणार असल्याचे म्हणाले.
No comments:
Post a Comment