Saturday, 9 September 2017

वन्यजीव सप्ताह निमित्ताने निबंध,चित्रकला व छायाचित्र स्पर्धा १६ सप्टेबरपर्यंत प्रवेशिका आमंत्रित

गोंदिया,दि.९ : सर्वसामान्य नागरिकासोबतच नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याबाबतची आस्था वाढत आहे. त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहनिमित्ताने वन विभागाच्या वतीने विविध स्तरावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा हया नि:शुल्क असून १६ सप्टेबरपूर्वी प्रवेशिका मागविल्या आहे.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा अ गटासाठी असून यामध्ये महाविद्यालयीन गट/मुक्त गट यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वन्यप्राण्यांच्या अवयवाचे तस्करी प्रतिबंध उपाययोजना या विषयावर एक हजार शब्द मर्यादेचा निबंध, ११ वी ते १२ वी या कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी लोकसहभागातून वन्यजीव संवर्धन या विषयावर ७५० शब्द मर्यादेचा निबंध, माध्यमिक विद्यालयीन गटातील इयत्ता ८ वी ते १० वीसाठी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश या विषयावर ५०० शब्द मर्यादेचा निबंध आणि इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वन्यप्राणि व निसर्गाची ओळख या विषयावर ५०० शब्द मर्यादेचा निबंध यावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रकला स्पर्धेचा गट चित्रकला विद्यालयीन विद्यार्थी/चित्रकला महाविद्यालयीन विद्यार्थी/मुक्त गट यांच्याकरीता घोषवाक्यासह राज्यस्तर भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा विषय सुरक्षीत पर्यावरण उन्नतेचे साधन हा आहे. सर्वसाधारण महाविद्यालयीन विद्यार्थी/कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेसाठी घोषवाक्यासह भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा विषय निसर्ग पर्यटन एक वेगळा अनुभव हा आहे. माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मला आवडलेला सुंदर पक्षी हा विषय, इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी माळढोक पक्षी हा विषय, तर इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी पक्षाचे घरटे हा विषय चित्रकला स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे.
छायाचित्र स्पर्धा महाराष्ट्रातील हौसी व व्यावसायीक छायाचित्रकारांसाठी मुक्तगटात आयोजित करण्यात आले असून जैवविविधता मानव चेतना हा विषय, महाविद्यालयीन/शालेय गटासाठी सागरी जीव समुदाय हा‍ विषय आणि वन विभागातील वर्ग ब, क व ड या क्षेत्रीय कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी माझे वन आणि वन्यजीव विषयक अविस्मरणीय छायाचित्र या विषयावर छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वरील सर्व स्पर्धा हया नि:शुल्क असून शासकीय व महाविद्यालयीन गटांनी संबंधित शिक्षण प्रमुखामार्फत संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा उपवनसंरक्षक गोंदिया यांचेकडे १६ सप्टेबरपूर्वी प्रवेशिका पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.
चित्रकला स्पर्धेतील मुक्त गटांच्या स्पर्धकांनी त्यांचे भित्तीचित्रे व छायाचित्रे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), वन भवन, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर या पत्त्यावर १६ सप्टेबरपूर्वी थेट पाठवावे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपवनसंरक्षक वन विभाग गोंदिया व संबंधित तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन गोंदियाचे उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...