Wednesday, 6 December 2017

गडचिरोली येथे 7 नक्षल्यांना कंठस्नान



गडचिरोली ,दि. 6 :– सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज ६ डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ जहाल नक्षलवादी कंठस्रान घातले. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नक्षल विरोधी अभियानचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली.
पत्रकार परिषदेस गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी. आर. सामी उपस्थित होते. शरद शेलार यांनी सांगितले की, कल्लेडच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन जवानांनी तेथे अभियान राबविले. यावेळी २० ते २५ च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी पळून गेले. मात्र, घटनास्थळावर ५ महिला व २ पुरुष नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. ७ पैकी ६ नक्षल्यांची ओळख पटल्याची माहितीही श्री.शेलार यांनी दिली.
मृत नक्षल्यांमध्ये आयतू उर्फ अशोक कंगा पेंदाम(३८)रा.लिंगमपल्ली, ता.अहेरी याचा समावेश आहे. अशोक पेंदाम हा अहेरी दलम कमांडर असून, त्याच्यावर शासनाने ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या चकमकीत छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील कवंडे येथील सरिता नामक नक्षलीही ठार झाली. ती सिरोंचा दलम सदस्य होती. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. सिरोंचा एसीएमचा सदस्य चंदू हादेखील चकमकीत ठार झाला. त्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस होते. पेरमिली दलम सदस्य शैला, रा.पोकूर, ता.भामरागड हीसुद्धा ठार झाली. तिच्या शिरावर २ लाखांचे बक्षीस होते. प्लाटून क्रमांक १४ ची सदस्य अखिल कुळमेथे, रा.कापेवंचा, ता.अहेरी हीदेखील ठार झाली. तिच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच देचलीपेठा उपपोलिस ठाण्यांतर्गत सिंधा येथील रहिवासी सुनीता कोडापे हिलाही पोलिसांनी कंठस्नान घातले. सिरोंचा दलम एसीएमची सदस्य असलेल्या सुनीतावर ६ लाखांचे बक्षीस होते. एका महिला नक्षलीची ओळख अद्याप पटली नसून, ओळख पटविण्याचे कार्य सुरु असल्याचे श्री.शेलार यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरुन २ एसएलआर, २ आठ एमएम रायफली, २ बारा बोअर रायफली, १ बारा बोअर कट्टा यासह माओवादी पत्रके व साहित्य जप्त केले आहे. पीएलजीए सप्ताहादरम्यान प्रथमच माओवाद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये गोविंदगाव चकमकीमध्ये नक्षल्याचे मृतदेह सी-६० पथकाला मिळाले होते. त्यानंतर आज कल्लेडच्या चकमकीत पोलिसांना मिळालेले हे सर्वांत मोठे यश आहे. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नक्षलवादी सामान्य आदिवासी व दलित नागरिकांना पोलिस खबऱ्या घोषित करुन त्यांची क्रूरपणे हत्या करतात. त्याला गडचिरोली पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे शरद शेलार म्हणाले.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...