नागपूर,दि.03- राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मौदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कढोली येथे एसटी बस आणि ट्रेलरमघ्ये झालेल्या एका भीषण अपघातात बस चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून 26 प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. जखमींना तातडीने नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहेत.
मृतांमध्ये बसचालक हेमंत प्रल्हाद कापसे (वय-30) राहणार तुमसर, इंद्रसेन महादेवराव ठाकरे (वय 70) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमधील 12 पुरुष आणि चार महिला जखमींना उपचारार्थ नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. किरकोळ जखमींमध्ये राधेश्याम मानकर (40), सुषमा राधेश्याम मानकर (35), प्रथमेश राधेश्याम मानकर (12), कलश राधेश्याम मानकर (9) चौघेही रा. भेंडाळा, ता. मौदा, जिल्हा नागपूर, रिया राजेश गौरे (20, रा. तुमसर, जिल्हा भंडारा), दिनेश वर्मा (40), अशोक वर्मा (45), दीनाप्रसाद बाती (44) व चिमण वर्मा (80) चौघेही रा. बाभूळबन, नागपूर व प्रभाकर राऊत (23, रा. भंडारा) यांचा समावेश असून, या सर्वांवर कढोली येथील रामकृष्ण मठाच्या धर्मादाय दवाखान्यात उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. हा अपघात इतका भीषण होती की बसचालकाला क्रेनने बसची केबिन कापून बाहेर काढावे लागले.
सविस्तर असे की, तुमसर आगाराची बस क्र.एमएच-40/8995 ही साडे अकराच्या सुमारास नागपूरवरून कटंगीकडे रवाना झाली होती. या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. सदर बस ही कढोली नजीक येताच एमएच-31 सीबी 419 या टिप्परला मागून धडकली. हा टिप्पर टायर फुटल्याने रस्त्यात उभा होता. दरम्यान, डांबरमिश्रित गिट्टी असलेला हा नादुरुस्त टिप्पर हा दीड तासापासून रस्त्यात उभा होता. या प्रकरणी मौदा पोलिस गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment