पवनी,दि.20ः- सौंदड पुनर्वसन येथे ७ जुलै रोजी गोतस्करांनी गावकर्यांना केलेल्या बेदम मारहाणीत अनेक गावकरी जखमी झाले होते. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अड्याळ पोलिस ठाण्याचे तत्कालिन ठाणेदारांसह तब्बल ११ पोलिस कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांकडे दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी तत्कालिन ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक किचक यांना निलंबित केले. तर हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून जे पोलीस घटनेच्या दिवशी न्यायालयीन पेशीवर, वाहतूक ड्यूटीवर, साप्ताहित सुटीवर तर काही ड्यूटी करून घरी असलेल्या कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस हवालदार अनिल नंदेश्वर, भगतसिंग बैस, पोलीस नायक दर्शना टेंभुर्णे, सहाय्यक फौजदार शरद गिर्हेपुंजे, पोलीस हवालदार ग्यानिराम बोरकर, दादाजी कठाणे, अश्विन सतदेवे, हरिष कांबळे, पोलिस शिपाईलिंगदेव निंबार्ते, मंगला शेळके, पोलीस हवालदार जितेंद्र भोगे यांचा समावेश आहे.
दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पुरूषोत्तम दामा केवट (७0) व कारू निंबार्ते हे जनावरे जंगलातून चराई करून घराकडे परत येत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला बाजूला करून रस्ता मोकळा करा, असे गोतस्करांना म्हणाले. यावरून कडाक्याचे भांडण झाल्यानंतर तस्करांनी पुरूषोत्तम केवट व कारू निंबार्ते यांना बेदम मारहाण केली व निघून गेले. काही वेळानंतर आरोपी नजू शेख व त्याचा मोठा भाऊ सलमान सोहेल पठाण, तौसिक शेख, प्रदिप नागोलकर व इतर १५ ते २0 इसमांनी सौंदड पुनर्वसन येथे जाऊन काठी व लोखंडी रॉडने घरातील दरवाजा फोडून लोकांना मारहाण केली. यामध्ये चंद्रभान भुते यांचा पाय मोडला तर भारत मेर्शाम यांना गंभीर दुखापत झाली तसेच इतर लोक जखमी झाले होते.
सदर प्रकरणात ग्रामस्थांनी अड्याळ पोलीस स्टेशनवर मोर्चाकाढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी उलट दंडूकेशाहीचा अवलंब करून लाठीचार्जकेला व सौंदड ग्रामस्थांवर गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणाला १५ दिवसांचा कालावधी लोटूनही आरोपी अद्यापही पोलिसांना गवसले नाही.
No comments:
Post a Comment