नवेगावबांध,दि.19 : येथील राष्ट्रीय उद्यानात अवैधपणे प्रवेश करुन सारई दुर्मिळ पक्षाची शिकार केल्याप्रकरणी मौजा येलोडी येथील १४ जणांना अटक करुन वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील रामपुरी बीटच्या कक्ष क्रमांक २२३ व ७१८ मध्ये येलोडी येथील काही शिकाऱ्यांनी ३० जूनला सारई या दुर्मिळ पक्षाची शिकार केल्याची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे १३ जुलैला येलोडी येथील मनोज धनीराम मळकाम (३१) या इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह शिकार केल्याची कबुली दिली. टिकाराम मळकाम (४८), महेंद्र भुमके (२४), भूपेश भुमके (२४) देवदास दुर्गे (३६), प्रवीण कोडापे (२३), नितेश शहारे (१९), विश्वनाथ इळपाते (२६), जितेंद्र पुराम (२६), जितेंद्र भुमके (२४), किर्तीदास गेडाम (२६), भरत सलामे (३२), संतोष मडावी (३१), दिगांबर भुमके (२६) सर्व राहणार येलोडी या सर्वानी मिळून ३० जूनला शिकारी कुत्रे व बार्चीच्या सहाय्याने नर व मादी सारई पक्षाची शिकार केल्याचे वन विभागाच्या चौकशीत कबूल केले. त्यामुळे या सर्व १४ आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २७ (१), ३१,३५(६), ९, ५०, ५१ अन्वये वनकार्यवाही करुन वन गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई वनसंरक्षक पी.डी.म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी विजय धांडे, क्षेत्रसहाय्यक एस.आर.दहिवले, वनरक्षक ए.एच.चौबे,चौकेवार, आर.जे.धकाते, आर.एम.सूर्यवंशी, डी.के.सूर्यवंशी, पी.आर.पाथोडे यांनी केली. वनपरिक्षेत्राधिकारी विजय धांडे पुढील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment