Wednesday, 4 July 2018

मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका-विनिती साहू


भंडारा दि. 4:- जिल्ह्यात मुले पळविल्याची एकही घटना अलीकडच्या काळात कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी केले आहे.
मागील काही दिवसापासून काही समाजकंटक व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या भंडारा जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू आणि भंडारा जिल्हा पोलिसांकडून जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. अलीकडच्या काळात जिल्ह्यात मुले पळवून नेल्याची एकही घटना घडलेली नाही किंवा जिल्ह्यातील एकाही पोलीस ठाण्यात तशी तक्रारही आलेली नाही. त्यामुळे अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...