गोंदिया,दि.23- 'नक्षल दमन सप्ताह' अंतर्गत देवरी पोलिसांच्या वतीने जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षली दरवर्षी नक्षल शहिद सप्ताहाचे आयोजन करीत असतात. या दरम्यान अनेक हिंसक कारवाया घडवून आणून राष्ट्रीय मालमत्तेची हानी आणि जीवहानी मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांकडून केली जाते. या कारवायांनी पायबंद घालण्यासाठी पोलिस विभागाकडून नक्षलदमन सप्ताहादरम्यान अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांना मार्गदर्शन आणि जाणीव जागृतीचे कार्य राबविले जाते.
या अंतर्गत गेल्या 24 एप्रिल 1993 रोजी देवरी तालुक्यातील मंगेझरी या गावात झालेल्या भूसुरुंगस्फोटात शहीद झालेल्या 7 लोकांचे स्मारक बांधकामास सुरवात करण्यात आले आहे. गेल्या 21 तारखेला "नक्षलवाद- आदिवासी जनतेवरील क्रूर अत्याचार" या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 7 शाळेतील 166 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. आज दि.23 रोजी "नक्षलवाद- लोकशाही व विकासाचा शत्रू" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 5 शाळेतील 44 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment