Wednesday 25 July 2018

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा




कोरची,दि.25ः- २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजपने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण ६ वरून १९ टक्के करण्याचा निर्धार चामोर्शी येथे झालेल्या जाहीर सभेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी यांनी केला होता. मात्र, चार वर्षे लोटूनही अजूनपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत सत्ता पक्षाचे एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. त्यामुळे शासनाच्या मेगा भरती अगोदर गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करून मेगा भरती घेण्यात यावी, अशी मागणी कोरची तालुका ओबीसी संघटनेने तहसीलदांरामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी प्रवर्गात सुमारे ५00 च्या वर जातीचा समावेश आहे. त्यांच्यासाठी असलेले सहा टक्के आरक्षण त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अतिशय नगण्य आहे. ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारे व त्यांना मागासलेपणाच्या गर्तेत लोटणारे आहे. सध्या होणार्‍या भरती प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गाच्या वाट्याला एकही जागा येत नसल्याने ओबीसी प्रवर्गातील लाखोंच्या संख्येत सुशिक्षित बेरोजगार तरुण बेरोजगार आहेत.
ओबीसींनी स्वत: होणार्‍या अन्यायाच्या विरोधात अतिशय संयमपणे आपली भूमिका शासनापुढे ठेवली आहे. मात्र न्यायोचित मार्गाने त्यांचे प्रश्न सुटत नसतील तर गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी सामूहिक आत्मदहनाचा सोहळा आयोजित करून आपले लक्ष या प्रश्नाकडे वेधावे का याबाबत आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. सदर मागणी १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कोरची तालुक्यातील ओबीसी संघटनेच्यावतीने १५ ऑगस्टला तहसील कार्यालयातील शासकीय ध्वजारोहणास अर्धनग्नावस्थेत राष्ट्रध्वजाला सलामी देऊ, यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना अशोक गावतुरे, भजन मोहुर्ले, राष्ट्रपाल नखाते, राहूल मांडवे, महादेव बन्सोड, भुमेश्‍वर शेंडे, आसाराम सांडील, राजन मेर्शाम, शिखा शेंडे, हेमलताबाई शेंडे, मधुकर शेंडे, विनोद गुरनुले, गोपाल मोहुर्ले, मुरलीधर शेंडे, गजानंद मोहुर्ले, केशव मोहुर्ले, राकेश शेंडे, विठ्ठल शेंडे, प्रा. पि. के. चापले, नंदकिशोर वैरागडे, नितीन शेंडे, धमेंद्र येवले, जितेंद्र मोहुर्ले, शेषराव मोहुर्ले, प्रदीप गावतुरे, खुशाल जनते, अनिल उईके, विनोद गुरनुले, हेमंत शेंडे, हंसराज मोहुर्ले, अशोक गुरनुले, अक्षय मोहुर्ले, महेश शेंडे, मुकेश मोहुर्ले, कृषी मोहुर्ले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...