Monday 2 July 2018

शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा-हर्षदा देशमुख


  • कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान
वाशिम,दि.०2 : हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी प्रयत्न केले. शेतीमधील उत्पन्न वाढल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी कृषि विद्यापीठांची स्थापना करून शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला. नवनवीन तंत्रज्ञानामुळे आज कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून अधिक उत्पन्न घेण्याची आवश्यकता आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी व्यक्त केले. कृषि विभागाच्यावतीने जिल्हा नियोजन भवन येथे कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, प्रमोद कापडे, सुदाम इस्कापे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी श्री. जोशी, कृषि विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी विकास गौड, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्र विषयाचे तज्ज्ञ आर. एस. डवरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती श्री. सानप म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. याकरिता कृषि तसेच संबंधित इतर विभागांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच आवश्यक ते पूर्ण सहकार्य करण्याची गरज आहे. शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देऊन त्याच्या शेतीतील उत्पन्न वाढीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने तसेच प्रगतशील शेतकरी प्रतापसिंह गुलाबसिंह पवार व चंद्रकांत रामधन राठोड यांनीही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपुस्तिकेचे विमोचनही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान
शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात व कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आज कृषि दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये सखाराम कडूजी काकडे (टो, ता. वाशिम), गजानन जयाजी सोमटकर (घाटा, ता. मालेगाव), संतोष प्रकाश आवताडे (बाळखेड, ता. रिसोड), प्रतापसिंह गुलाबसिंह पवार (बेलखेडा, ता.कारंजा), गजानन राऊत (वनोजा, ता. मंगरूळपीर), चंद्रकांत रामधन राठोड (साखरडोह, ता. मानोरा) या शेतकऱ्यांचा समावेश होता. कृषि अधिकारी कुंडलिक शामराव देशमुख, विस्तार अधिकारी हेमराज राठोड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...