गोंदिया,दि.04ः-यंदाच्या खरीप हंगामाला जेमतेम सुरुवात झाली असताना व सद्या शेतकर्यांची पेरणीचीच कामे सुरू असताना जिल्हास्तरीय दक्षता पथकाच्या चमूने कृषी केंद्रांच्या पडताळणीदरम्यान जिल्ह्यातील १२ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावले असून शेतकर्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर दोन कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. यातील एका कृषी केंद्राला निलंबित करण्यात आले असून एकाची कारवाई सुरू आहे. कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे इतर कृषी केंद्र संचालकांमध्ये मात्र चांगलीच खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी कृषी केंद्र संचालकाकडे शेतकर्यांची बियाणे अथवा खत विक्री संदर्भात फसवणूक केली जाते. बर्याचवेळा खत विक्रीची रक्कम शेतकर्यांकडून अवाजवी प्रमाणात घेऊन शेतकर्यांची दिशाभूलही केली जाते. याकडे लक्ष ठेवून जिल्हा स्तरीय दक्षता पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यात विना परवाना धारक खत विक्रेत्यांबरोबरच परवानाधारक कृषी केंद्रांची पडताळणी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येते.
जिल्ह्यात १ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्राखाली खरीप हंगामात धान पिकांची लागवड केली जाते. त्यानुरुप प्रत्येकवर्षी जिल्ह्यात आवश्यक त्या प्रमाणात रासायनिक खतांचे आवाटन मंजूर केले जातात. मात्र, यातून मार्ग काढीत स्वत: चे खिशे गरम करण्याकरिता काही खत विक्रेते शेतकर्यांना अवाजवी किमतीने खतांची विक्री करीत असतात. खताविषयी अज्ञान व शेतकर्यांना सुद्धा कोणत्या खताचा उपयोग केल्यास पीक उत्पादनात वाढ होईल या विषयी पुरेश्या प्रमाणात माहिती नसल्याने अवैध विक्रेत्यांकडून खत खरेदी करीत असतात. परंतु बर्याचवेळा विक्रेत्यांकडून शेतकर्यांची फसवणूक सुद्धा केली जात असते यावर नियंत्रण घालण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता पथकाच्या माध्यमातून कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ४६0 बियाणे विक्री केंद्र, ६0५ रासायनिक, २५५ किटक नाशक अशी सर्वच प्रारुपातील सुमारे साडेपाचशे दुकाने आहेत. त्यातच येथील जिल्हा स्तरीय दक्षता पथकाच्या चमूने जिल्ह्यातील २१0 कृषी केंद्राची पडताळणी केली असता त्यापैकी १२ कृषी केंद्रात बील बुक नसणे, स्टॉल बुक नसणे, परवाना नुतणीकरण, खोटी सील, फलक न लावणे, स्त्रोत प्रमाणपत्र नसणे आद अनियमीतता आढळून आली.
दरम्यान, या सर्व १२ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात सालेकसा तालुक्यातील ५, देवरी २, अर्जुनी मोर २, गोंदियातील ३ कृषी केंद्रांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment