तिरोडा,दि.21ः- तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.रस्त्याच्या दयनिय स्थितीमुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये तिरोडा, घाटकुरोडा-घोगरा मार्गे देव्हाड्याला जाणारी एसटी बस बंद केली जाते. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची फजिती होते. शासनाचे लक्ष केंद्रीत व्हावे, याकरिता जि.प. सदस्य डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये एक उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यावर मोठ्या स्वरुपाचे खड्डे तयार झाले असून त्या खड्यांत वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच देव्हारे, तंमुस अध्यक्ष सुरेश भांडारकर, ग्रा.पं. सदस्य गंगाधर भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था खूप वाईट असते. त्यामुळे पावसाळ्यात बसेस बंद असतात. जनता व विद्यार्थ्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. घाटकुरोडा, घोगरा व देव्हाडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करुन रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या रस्त्याचे काम १२ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावरुन पाच रेतीघाट पडतात. यात घाटकुरोड्याचे दोन व ग्राम चांदोरी, बिरोली आणि मुंडीपार येथील प्रत्येकी एक. या घाटावरील रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांची संख्या ५०० ते ५५० च्यावर असून सातत्याने वर्दळ असल्याने रस्त्याचे पूर्ण बेहाल झाले आहे.
रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने उन्हाळ्यात धूळ घरात जाते. पावसाळ्यातील खड्ड्यात साचलेले पाणी लोकांच्या अंगावर व घरात शिरत आहे. तरी प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित झाला आहे. रेतीघाटच्या कंत्राटदारांना बोलण्याचा प्रयत्न गावकरी करतात तर त्यांच्याशी अरेरावीपणा केली जाते, अशी माहिती जि.प. सदस्य डोंगरे, घोगराच्या सरपंच गीता देव्हारे, पोलीस पाटील चंद्रºहास भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment