वाशिम, दि.०2: पर्यावरणाचे
रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करून वृक्षांची संख्या
वाढविणे, ही काळाची गरज आहे. याकरिता प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड
मोहिमेत सहभागी होऊन वृक्ष लागवडीसोबतच त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार
घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. १३ कोटी
वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद परिसरात आयोजित
कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन
समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
दीपक कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, रोहयोचे
उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, प्रमोद
कापडे, सुदाम इस्कापे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने,
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे
सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, वन परिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, कृषि
विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे आदी उपस्थित होते.
श्रीमती देशमुख म्हणाल्या, वृक्ष लागवड
मोहिमेमध्ये सहभागी होऊन जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने घराचा परिसर किंवा
शेतामध्ये किमान एक तरी वृक्ष लावावे. तसेच आपण लावलेले रोपटे जगविण्याची
जबाबदारी पार पाडावी. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनामध्ये लोकांचा सहभाग
वाढल्यास वृक्ष लागवड मोहीमेला गती मिळेल व पर्यावरण संवर्धनास मदत होईल,
असे त्यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन
समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
दीपक कुमार मीना यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
राज्य शासनाच्यावतीने ५० कोटी वृक्ष लागवड
मोहिमेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा
जिल्हात आज शुभारंभ झाला. दि. ३१ जुलैपर्यंत हा वृक्ष लागवड कार्यक्रम सुरु
राहणार आहे. या कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८३ हजार ६२६
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण
मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. विविध विभागामार्फत १४ लक्ष ६२
हजार ८६१ खड्डे खोदण्यात आले आहेत. सर्व संबधित विभागांना आवश्यकतेनुसार
रोपे पुरविण्यात येणार असून त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
आजपासून जिल्ह्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणास सुरुवात झाली आहे.
No comments:
Post a Comment