जयसिंगपूर,दि.19- गेल्या दीड वर्षात दुधाचे खरेदी दर २५ रुपयांवरून १५ रुपयांवर आले. परिणामी, दुग्धव्यवसाय तोट्यात आला आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. मात्र, सरकारने दुग्ध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नोटाबंदी, जीएसटी यामुळे शेतीमालाचे भाव घसरले आहेत. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. शेतीमालाला भाव नाही, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. अशातच दुधाचे खरेदी दर १५ रुपयांवर आले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून असलेला दुग्धव्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे. राज्य सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने व योग्यवेळी उपाययोजना न करता चुकीचे धोरण ठरविल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारने आमच्या माता भगिनींना विधवा करण्याचे महापाप केले आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसव राज्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावाल अशी मागणी करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी सरिता लक्ष्मण भवरे, पद्माराणी पाटील, सुनीता धन्यकुमार मादनाईक, पूजा विजय कोळी, सविता प्रकाश ठोमके, रेवती स्वस्तिक पाटील, स्वाती शैलेश चौगुले, भारती महावीर पाटील, प्रमिला रमेश पाटील, निर्मला संजय पाटील, मिनाक्षी दीपक जाधव, स्वाती सागर मादनाईक, सुवर्णा संजय अपराज यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
No comments:
Post a Comment