चंद्रपूर,दि.21ःःमुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलिस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलिस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्य़ांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक स्तरावर असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाद्वारे अशा गुह्य़ांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कठोर कारवाईची भूमिका स्वीकारावी, असे सक्त निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिस अधिकार्यांना दिले.
स्थानिक शासकीय विर्शामगृहात मंगळवारी जिल्ह्य़ातील विविध प्रकारच्या गुन्हे विषयक प्रकरणांचा जिल्हा पोलिस प्रशासनाकडून त्यांनी आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर व प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये ना. अहीर यांनी अनेक गंभीर गुन्ह्य़ाकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले. अशा गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी तपास कार्याला गती द्यावी, तपास अधिकार्यांना कालबध्द अवधीमध्ये तपासाचा छडा लावण्याची सूचना द्यावी व अशा गंभीर प्रकरणांच्या तपास प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी आढावा घेऊन कार्य अहवाल मागवावा, अशी सूचनाही ना. अहीर यांनी यावेळी केली. फुस लावून पळवून नेलेल्या १८ वर्षांखालील मुलींची वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली जावी, भादंवि कलम ३७६, ३५४ व पास्को यासारख्या कलमांचा अपराधाची तीव्रता व परिस्थितीजन्य पुराव्याच्या पार्श्वभूमिवर वापर केला जावा. तरच अशा असामाजिक कृत्य करणार्या प्रवृत्तींवर पायबंद घालणे शक्य होईल. सन २0१३ ते २0१७ पयर्ंतच्या गुन्हेविषयक अहवालानुसार अपहरण, फुस लावून व लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन व सज्ञान मुली पळवून नेण्याचे आकडे चिंतेत भर घालणारे आहे, असे ना. अहीर म्हणाले. या बैठकीला विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत, एसडीपीओ सुशिलकुमार नायक, शेखर देशमुख, पवार, हिरे, पोलिस निरीक्षक गोतमारे, भगत, आमले, शिरस्कर यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment